भारत-चीन सीमेवर तणाव, अमेरिकेचा चीनला इशारा
चीनी सैन्याकडून सतत घुसखोरीचा प्रयत्न
नवी दिल्ली : वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनचा घुसखोरीचा डाव पुन्हा एकदा भारतीय लष्कराच्या जवानांनी उधळून लावला आहे. चार दिवसांतच चीनने तीन वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, पण भारताच्या आक्रमक पावित्र्यानंतर चिनी सैनिकांना परत जावे लागले. यामुळे, एलएसीवरील परिस्थिती तणावपूर्ण आहे. चीनच्या या घुसखोरीवर अमेरिकेने कठोर भूमिका घेतली आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हटले की, आम्ही यावर बारीक नजर ठेवून आहोत आणि शांततेची आशा करतो. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ अनेकदा म्हणाले होते की, बीजिंग सतत आपल्या शेजार्यांशी आणि इतर देशांशी वाद घालण्याचा प्रयत्न करत आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हटले की, 'तैवान स्ट्रेट ते शिनजियांग पर्यंत, दक्षिण चीन समुद्रापासून हिमालय पर्यंत, सायबरस्पेसपासून इंटल ऑर्गनाइजेशनपर्यंत, आम्ही चिनी कम्युनिस्ट पक्षाबरोबर काम करत आहोत, जे स्वतःच्याच लोकांचा दडपण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपल्या शेजार्यांना धमकावत आहेत. हे थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे बीजिंग विरुद्ध उभे रहाणे.'
महत्त्वाचे म्हणजे 29 ऑगस्टपासून चीनने तीनदा एलएसीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. 29-30 ऑगस्ट रोजी चीनी सैनिकांनी पहिल्यांदाच पँगोंग भागात घुसखोरी केली. त्यानंतर दुसऱ्यांदा 31 ऑगस्टच्या रात्री, चिनी सैन्याने हेलमेट टॉप भागात घुसण्याचा प्रयत्न केला. ज्याला भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिले.
यानंतर, 1 सप्टेंबर रोजी, चिनी सैन्य चेपुजी पोस्टपासून पुढे येण्याचा प्रयत्न करत होते. भारतीय छावणीत याचे संकेत मिळताच भारतीय सैन्य अलर्ट झालं. भारतीय जवानांनी त्यांना इशारा दिला. त्यानंतर भारतीय जवानांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर चीनला माघारी जावे लागले.