श्रीलंकेतील भयावह स्थिती, 2 वेळच्या जेवणासाठी महिलांना करावा लागतोय शरीराचा सौदा
श्रीलंकेतील परिस्थिती सध्या खूपच वाईट वळणावर पोहोचली आहे. येथे महिलांना अन्नसाठी आपलं शरीर विकावं लागत आहे.
मुंबई : श्रीलंकेतील परिस्थिती आता बिकट होत चालली आहे. लोकांना आता घरं चालवणे कठीण झाले आहे. अन्न आणि औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे लंकेत आता महिलांना वेश्याव्यवसायात उतरावं लागत आहे. आपल्या पोटापाण्यासाठी अनेक महिला सेक्स वर्कर बनल्या आहेत. आयुर्वेदिक स्पा सेंटरच्या नावाखाली येथे सेक्स वर्क सुरू आहे. स्पा सेंटर्स वेश्यालय बनले आहेत.
रिपोर्ट्सनुसार, बहुतेक महिला या कापड उद्योगातून येत आहेत. जानेवारीपर्यंत काम होते, मात्र त्यानंतर देशाच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे त्यांना वेश्या व्यवसायात यावे लागले.
श्रीलंकेतील दैनिक द मॉर्निंग या दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार, वस्त्रोद्योगात नोकरी करणाऱ्या स्त्रिया नोकरी गमावण्याच्या भीतीमुळे आणि देशाची कमकुवत अर्थव्यवस्था म्हणून पर्यायी रोजगार म्हणून वेश्याव्यवसायाकडे वळत आहेत. एका महिलेने या वृत्तपत्राला सांगितले की, 'आम्ही ऐकले आहे की देशातील आर्थिक संकटामुळे आम्ही आमच्या नोकऱ्या गमावू शकतो आणि या क्षणी आम्ही पाहत असलेला सर्वोत्तम पर्याय म्हणजे सेक्स वर्क.'
सेक्स वर्कर महिलांच्या संख्येत तब्बल 30 टक्के वाढ झाली आहे. जी खरंच भयावह आहे. वेश्याव्यवसाय वाढण्यामागे अनेक कारणे आहेत, त्यातील सर्वात प्रमुख कारण म्हणजे महागाई. या संकटात सापडलेल्या देशात इंधन, अन्न आणि औषधांच्या तुटवड्यामुळे महिलांसाठी परिस्थिती आणखी निराशाजनक झाली आहे.
अनेक अहवाल असेही सूचित करतात की महिलांना अन्न आणि औषधांसारख्या आवश्यक वस्तूंच्या बदल्यात स्थानिक दुकानदारांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जात आहे.
या असहाय महिलांना ग्राहकांच्या विनंतीनुसार असुरक्षित लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जात असल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे. एवढेच नाही तर या महिलांना अनेकदा ग्राहकांच्या शिवीगाळ आणि मारहाणीलाही सामोरे जावे लागत आहे.