Elon Musk यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी 44 अब्ज डॉलर्स कसे उभे केले?
काही महिन्यांपूर्वी जवळपास तुटलेला ट्विटर खरेदीचा करार अखेर पूर्ण झालाय
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरसोबत (Twitter) करार पूर्ण करत त्याची मालकी मिळवली आहे. आता एलॉन मस्क हे ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नवे मालक बनले आहेत. काही महिन्यांपूर्वी मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्याची घोषणा केली होती. मात्र आर्थिक व्यवहार पूर्ण न झाल्याने हा करार होऊ शकला नव्हता. आता इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरसोबत करार पूर्ण करत कंपनी आपल्या ताब्यात घेतली आहे. पण एलॉन मस्क यांनी 44 अब्ज डॉलर इतकी मोठी रक्कम कोठून उभारली? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. (How Elon Musk Raised 44 Billion dollar to Buy Twitter)
Sequoia Capital, Binance आणि Qatar Investment Authority सारखे इक्विटी गुंतवणूकदार ट्विटर करारासाठी मदत करण्यास तयार होते. रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याच्या वृत्तानुसार, इलॉन मस्क यांच्या वकिलाने या गुंतवणूकदारांना या कराराची कागदपत्रे करण्याची जबाबदारी दिली आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटर 46.5 अब्ज डॉलर हिस्सेदारी (equity) आणि फायनान्सिंगद्वारे विकत घेण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती, जो करार 44 अब्ज डॉलरमध्ये मंजूर झाला होता.
अहवालानुसार, एलॉन मस्क हेच ट्विटर डीलसाठी मोठा निधी देणार आहेत. यानंतर उर्वरित निधी मोठ्या गुंतवणूकदारांकडून इक्विटी फायनान्सिंगच्या स्वरूपात येणे अपेक्षित आहे. बँक ऑफ अमेरिका, बार्कलेज (Barclays), बीएनपी परिबास (BNP Paribas),मिझुहो (Mizuho), मॉर्गन स्टॅनले (Morgan Stanley), एमयूएफजी आणि सोसायटी जनरलसह प्रमुख बँकांनी या करारासाठी 13 अब्ज डॉलर देण्याचे वचन दिले आहे.
यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनकडे उपलब्ध माहितीनुसार, एकट्या मॉर्गन स्टॅनलीने या करारासाठी सुमारे 3.5 अब्ज डॉलरचे योगदान दिले. याशिवाय, अनेक इक्विटी गुंतवणूकदार देखील ट्विटर करारासाठी वित्तपुरवठा करण्यास तयार आहेत.
दरम्यान, एलॉन मस्क हे ट्विटरचे नवे मालक बनल्यानंतर त्यांनी कंपनीचे सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) पराग अग्रवाल, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेहगल आणि कायदेशीर व्यवहार आणि धोरणांच्या प्रमुख विजया गड्डे यांना बाहेर काढल्याची माहिती समोर आली आहे.