नवी दिल्ली : कधीकाळी ऐशोआरामाचे जीवन जगणाऱ्या व्यावसायिक विजय माल्ल्यावर उधारी मागून जगण्याची वेळ आली आहे. पत्नी, मुले आणि मित्रांकडून मिळालेल्या पैशांवर तो सध्या गुजराणा करतोय. बुधवारी ब्रिटनच्या न्यायालयात त्याने आपले दु:ख मांडले. त्याचा पार्टनर आणि पत्नीचे वार्षिक उत्पन्न 1.35 कोटी आहे. तर विजय माल्ल्याकडे 2 हजार 956 कोटींची संपत्ती आहे. या संपत्तीच्या सेटलमेंटसाठी त्याने कर्नाटक उच्च न्यायालयाला ऑफर देखील दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


11 सप्टेंबर 2018 ला 13 भारतीय बॅंकाकडून विजय माल्ल्या विरोधात याचिका दाखल झाल्या. ज्यावर सुनावणी सुरु आहे. मुले आणि पार्टनर ललवानी माझा संभाळ करत असल्याचे माल्ल्याने ब्रिटनच्या कोर्टात सांगितले. माल्ल्याने स्वत:चा गुजराणा करण्यासाठी व्यावसायिक बेदीकडून 75.7 लाख आणि आपली खासगी सहाय्यक महलकडून 1.15 कोटी रुपये उधार घेतले आहेत. कर्ज चुकवणे आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी त्याने हे कर्ज घेतले आहे. 


माल्ल्याच्या 13 बॅंकांचे प्रतिनिधित्व करणार्या निजेल तोजीकडून माल्ल्याने 11 हजार कोटींचे कर्ज घेतले आहे. एचएमआरसीकडून 2.40 कोटी रुपये आणि त्याचा माजी वकिल मैकफारलेंसकडूनही एक मोठी रक्कम घेतली आहे. भारतीय बॅंकाकडून घेतलेल्या 3.37 कोटी रुपयांपैकी कायदेशीर 1.57 कोटीची रक्कम देखील त्याने दिली नाही. एवढंच नव्हे तर माल्ल्याने ब्रिटीश सरकारचा साधारण 2.40 कोटी रुपयांचा कर देखील थकवला आहे. 


विजय माल्ल्या याने ट्विट करत आपले पैसे वापरून जेट एअरवेजला वाचवण्याची मागणी भारतीय बँकांकडे केली आहे. कर्नाटक हायकोर्टापुढे पीएसयू बँक आणि अन्य कर्जदारांचे पैसे परत देण्याचा प्रस्ताव मी यापूर्वीच ठेवला आहे, असं म्हणत आपले पैसे बँक का घेत नाही? असा प्रश्न त्याने उपस्थित केला. 'किंगफिशर एअरलाईन्स आणि त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी मी ४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. याची दखल कोणी घेतलीच नाही, उलटपक्षी माझ्यावर शक्य त्या सर्व मार्गांनी निशाणा साधला गेला. याच बँकांनी दर्जेदार सेवा देणाऱ्या एका कंपनीचं नुकसान केलं', असं म्हणत मल्ल्याने एनडीए सरकारच्या भूमिकेचा विरोध केला. 



 पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत विजय माल्याचे नाव न घेता माल्ल्यावर निशाणा साधला होता. लोकसभेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्तावा दरम्यान ते बोलत होते. ''जे लोक देशातून पळाले आहेत, ते ट्वीटरवर रडत आहेत की मी तर 9 हजार कोटी रुपये घेऊन निघालो होतो पण मोदींनी माझे 13 हजार कोटी रुपये जप्त केले'' असा टोला पंतप्रधानांनी नाव न घेता माल्ल्याला लगावला होता. माल्ल्याने पंतप्रधानांना उद्देशून एक ट्वीट देखील केले होते. मी पूर्ण आदराने पंतप्रधानांना विचारू इच्छितो, की ती रक्कम बॅंकानी माझ्याकडून घेण्यास ते का सांगत नाहीत ? यामुळे किमान पब्लिक फंडची रिकवरी होईल. मी कर्नाटक उच्च न्यायालयात सेटलमेंटची ऑफर याआधीच दिल्याचेही त्याने सांगितले.