Imran Khan Arrest: माजी पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Former PM Imran Khan) यांच्यामुळे पाकिस्तानमधील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, इम्रान खान आज भ्रष्टाचार प्रकरणी इस्लामाबाद कोर्टात हजर राहण्याठी जात असताना पोलिसांनी लाहोरमधील त्यांच्या घरात घुसखोरी केली असा आरोप पक्षाने केला आहे. इम्रान खान यांची पत्नी बुशरा बेगम घरात एकट्या असताना पोलिसांनी बॅरिकेड्स हटवले आणि घरात घुसले असा त्यांचा दावा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, तेहरिक-ए-इन्साफचे 10 कार्यकर्ते जखमी झाले असून, 30 जणांना अटक करण्यात आली आहे. इम्रान खान यांच्या पक्षाने ट्विटरला व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये पोलीस त्यांच्या समर्थकांवर लाठीचार्ज करत असल्याचं दिसत आहे. 


"बुशरा बेगम एकट्या असताना पंजाब पोलिसांनी झमन पार्कमधील माझ्या घराबाहेर लाठीचार्ज केला. कोणत्या कायद्यांतर्गत हे सुरु आहे? हा लंडन प्लानचा भाग आहे जिथे फरार नवाज शरीफ यांना पुन्हा आणण्याचे शब्द दिले जात आहेत," असं ट्वीट इम्रान खान यांनी केलं आहे.



गेल्या काही दिवसांपासून इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे इम्रान खान मात्र ही अटक बेकायदेशीर असून कोर्टाने दिलासा दिल्याचं सांगत आहेत. इम्रान खान अनेक सुनावणींसाठी गैरहजर राहिल्याने अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे यादरम्यान इम्रान खान यांचे समर्थक आणि पोलीस सतत आमने-सामने येत आहेत. त्यातच आता पोलिसांनी घरात घुसून त्यांना गुरांप्रमाणे मारहाण केली आहे. 



या आठवड्याच्या सुरुवातीला इम्रान खान यांच्या समर्थकांनी अटक टाळण्यासाठी त्यांच्या घराला घेराव घातला होता. यावेळी पोलिसांनी अश्रूधूर आणि पाण्याचा मारा केला होता. 


इस्लामाबाद हायकोर्टाने शुक्रवारी इम्रान खान यांच्याविरुद्ध जारी केलेलं अजामीनपात्र अटक वॉरंट स्थगित केलं. तसंच तोशखाना प्रकरणी जिल्हा न्यायालयात हजर होण्याची संधी दिली. तोशखाना हे पाकिस्तान सरकारमधील एका शासकीय विभागाचं नाव आहे. संविधानिक पदावर असताना मिळालेल्या भेटवस्तू संबंधितांना या विभागात जमा करायच्या असतात. इम्रान खान पंतप्रधानपदी असताना त्यांना अनेक मौल्यवान गोष्टी भेटवस्तू म्हणून मिळालेल्या होत्या. पण त्यांनी त्या तोशखानात जमा न करता त्या विकून पैसे मिळवल्याचा आरोप आहे. 


सुनावणीदरम्यान, इम्रान खान यांच्या वकिलांनी हायकोर्टात 18 मार्चला ते हजर राहतील असं आश्वासन दिलं. दरम्यान, इम्रान खान नोव्हेंबर 2022 ला प्रचारादरम्यान गोळी लागल्याने जखमी झाले होते. त्यांनी एका मुलाखतीत माझ्या जीवाला मोठा धोका असल्याचं म्हटलं आहे. अविश्वास ठराव जिंकू न शकल्याने गतवर्षी इम्रान खान यांची हकालपट्टी करण्यात आली. तेव्हापासून डझनभर कायदेशीर प्रकरणांमध्ये ते अडकले आहेत.