इस्लामाबाद: पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक सीमारेषेवरील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना इम्रान खान यांनी म्हटले की, पाकिस्तानी सरकार स्वत:च्या जनतेचे रक्षण करण्यासाठी कोणालाही प्रत्युत्तर द्यायला कटिबद्ध आहे. भारताने कोणतीही आगळीक किंवा दु:साहस करायचा प्रयत्न केला तर त्याला चोख आणि आक्रमक प्रत्युत्तर द्या, असे आदेश इम्रान खान यांनी लष्कराला दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१४ फेब्रुवारीला पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. यावेळी दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन सीआरपीएफच्या ताफ्यातील गाडीवर नेऊन आदळले होते. यामध्ये ४० भारतीय जवान शहीद झाले होते. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. 


या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्याला पूर्णपणे मोकळीक दिली होती. पाकिस्तानला कसे आणि कुठे प्रत्युत्तर द्यायचे, याचे सर्व अधिकार मोदींनी सैन्याला दिले होते. यानंतर आता इम्रान खान यांनीही आक्रमक पवित्रा घेतल्याने सीमारेषेवरील तणावात भर पडणार आहे. 


तत्पूर्वी गुरुवारी पाकिस्तान सरकारकडून मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदच्या जमात-उद-दवा आणि फलाह-ए-इन्सानियत या संस्थांवर बंदी घालण्यात आली. भारताकडून राजनैतिक स्तरावर पाकची सातत्याने कोंडी करण्यात येत आहे. त्यामुळे दहशतवादाविरुद्ध करावाई करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवरील दबाव वाढला आहे.