निवडणुकीनंतर भारत-पाकिस्तान संबंध सुधारतील- इम्रान खान
आम्ही शांती आणि प्रगतीच्या दिशेने पहिले पाऊल टाकल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली : आगामी निवडणुका संपल्यावर भारता सहित इतर देशांशी आपले संबंध सुधारतील असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. पाकिस्तानने शांती आणि प्रगतीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. जम्मू काश्मीरच्या पूलवामा जिल्ह्यात 14 फेब्रुवारीला जैश ए मोहम्मदने आत्मघाती हल्ला केला. यामध्ये 40 जवान शहीद झाले. पाकिस्तानात जैश ए मोहमदची पाळेमुळे आहेत. त्यानंतर भारताने बालाकोट येथे जैशच्या तळावर एअर स्ट्राईक केले. ही बाब पाकिस्तानला चांगलीच झोंबली. त्यांनीही भारतात विमाने घुसवून बॉम्ब हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय जवानांनी त्यांची विमाने पळवून लावली होती. यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला. भारतात 11 एप्रिल ते 19 मे पर्यंत सात चरणांत मतदान होणार आहे. 23 मे ला याचे निकाल लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांचे विधान येत आहे.
आम्ही शांती आणि प्रगतीच्या दिशेने पहिले पाऊल टाकल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे. व्हिसा सुधार कार्यक्रमात ते बोलत होते. पर्यटक आणि गुंतवणूक दारांना आकर्षित करण्यासाठी ऑनलाईन व्हिसामध्ये महत्त्वपूर्ण सुधारांची घोषणा त्यांनी यावेळी केली. भारतातील निवडणुका संपल्याव सर्व शेजारील राष्ट्रांशी पाकिस्तानचे संबध चांगले होतील असे ते म्हणाले. आमचे सर्व देशांशी संबंध सुधारतील आणि शांतीपूर्ण पाकिस्तान समृद्ध होईल.
'नव्या व्हिसा सुविधा या 175 देशांतील प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. झालेले हे सुधार देशाला 60 व्या दशकात घेऊन जातील जेव्हा पाकिस्तान वेगाने प्रगती करत होता. खुल्या देशाच्या दिशेने पाकिस्तानचे हे पहिले पाऊल आहे', असेही ते म्हणाले.