लाहोर: सार्वत्रिक निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर शनिवारी इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. २५ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत इम्रान खान यांच्या तेहरिक-ए-इन्साफ पक्षाला २७२ पैकी ११६ जागांवर विजय मिळाला होता. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवडून येण्यासाठी नॅशनल असेंबलीच्या सदस्याला १७२ मते मिळवावी लागतात.  इम्रान यांनी अन्य छोटया पक्षांचा पाठिंबा मिळवून बहुमताचा आकडा गाठला. 
 
भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू हे या शपथविधीला हजर होते. इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू वाघा बॉर्डरहून लाहोरला पोहचले आणि त्यानंतर इस्लामाबाद या ठिकाणी रवाना झाले. नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानमध्ये सार्वजनिक निवडणुका झाल्यानंतर झालेल्या बदलांचे स्वागत केले आहे. आता दोन्ही देशांनी शांततेसाठी पुढाकार घेतला पाहिजे असेही मत त्यांनी व्यक्त केले होते.