अमेरिकेत हॉटेलचे पैसे वाचवण्यासाठी इम्रान खान राजदुताच्या घरी राहणार
इम्रान खान यांच्या ताफ्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
इस्लामाबाद: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान येत्या २१ तारखेपासून तीन दिवसांसाठी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. या काळात एखाद्या महागड्या हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा अमेरिकेतील पाकिस्तानी राजदुताच्या घरी राहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे अमेरिकेतील महागड्या हॉटेलच्या भाड्याचे पैसे वाचतील आणि दौऱ्याचा खर्चही कमी होईल, असा इम्रान यांचा विचार आहे.
'डॉन' या दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार, इम्रान खान हे अमेरिकेतील वास्तव्यादरम्यान पाकिस्तानी राजदूत असद माजिद खान यांच्या घरी राहतील. मात्र, इम्रान खान यांचा हा निर्णय अमेरिकन सुरक्षा यंत्रणांच्या फारसा पचनी पडलेला नाही.
एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीने अमेरिकेतील विमानतळावर पाऊल ठेवल्यानंतर अमेरिकेच्या गुप्तचर विभागाकडून त्यांची सुरक्षा हाताळली जाते. तर वॉशिंग्टन शहर प्रशासनाकडून त्यांच्या प्रवास व इतर गोष्टींची काळजी घेतली जाते. अमेरिकेत दरवर्षी अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान येत असतात. त्यामुळे अमेरिकेतील केंद्रीय प्रशासन आणि वॉशिंग्टनमधील यंत्रणा एकत्रपणे काम करतात. जेणेकरून वॉशिंग्टनमधील दैनंदिन व्यवहारांवर या सगळ्याचा परिणाम होत नाही. मात्र, आता इम्रान खान यांच्या निर्णयामुळे संबंधित यंत्रणांसमोर नवा पेच उभा राहण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानी राजदूत असद माजिद खान हे वॉशिंग्टनच्या मध्यवर्ती परिसरात असणाऱ्या राजनयिक वसाहतीमध्ये राहतात. या परिसरात भारत, तुर्की, जपान यासह अनेक देशांचे दूतावास आहेत. याच परिसरात अमेरिकेतील अनेक अधिकारी, सिनेट आणि पाहुण्यांशी इम्रान खान यांच्या भेटीगाठींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पाकिस्तानी राजदूतांचे निवासस्थान लहान असल्याने या सगळ्या भेटी पाकिस्तानी दूतावासामध्ये होतील. मात्र, राजदूतांचे निवासस्थान आणि पाकिस्तानी दूतावास एकमेकांपासून लांबच्या अंतरावर आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळेत इम्रान खान यांच्या ताफ्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.