नवी दिल्ली : नवा पाकिस्‍तान आणि बदलचा नारा देत निवडणुक लढवणारे इमरान खान 11 ऑगस्टला पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी कार्यक्रमाच्या तारखेची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सोमवारी इमरान खान यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि शेजारील देश लोकशाहीची पायमुळं आणखी घट्ट करेल अशी इच्छा वर्तवली. यानंतर पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या या वक्तव्यानुसार मोदींनी संपूर्ण क्षेत्रात शांती आणि विकासाचं व्हिजन यावर देखील चर्चा केली. इस्लामाबादमध्ये खान यांच्या पक्षाने वक्तव्य केलं आहे की, पंतप्रधान मोदींनी दिलेल्या शुभेच्छांमुळे इमरान खान यांनी मोदींचे आभार मानले आहेत.


गरिबांच्या विकासासाठी रणनीती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इमरान खान यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या वक्तव्यात त्यांनी म्हटलं आहे की, 'संघर्षाचं समाधान चर्चेतून काढलं जावू शकतं. इमरान खान यांनी पंतप्रधान मोदींसोबत चर्चा करतांना म्हटलं की, भारत आणि पाकिस्तानने एकत्र येऊन गरिबांच्या विकासाठी रणनीती तयार केली पाहिजे.


पाकिस्तानच्या जनतेमध्ये आशा


पाकिस्‍तानची जनता इमरान खान यांना 'गेमचेंजर' म्हणून पाहत आहे. पाकिस्‍तानच्या लष्कराचं देखील त्यांना समर्थन असल्याचं म्हटलं जात आहे. निवडणुकीआधी पाकिस्‍तानचे जनरल कमर जावेद बाजवा यांनी देखील त्याचे संकेत दिले होते. त्यांनी देखील म्हटलं होतं की, भारतासोबत चर्चा हा एकमेव मार्ग आहे. पण भारत या प्रकरणात आधीपासून स्पष्ट आहे की, लोकशाही पद्धतीने निवडलेल्या सरकारसोबतच भारत चर्चा करेल.'


मोदींना आमंत्रण देणार?


पंतप्रधान मोदी आणि इमरान खान यांच्यात चर्चा झाल्यानंतर दोन्ही बाजुच्या लोकांमध्ये शांतीची आशा तयार झाली आहे. इमरान खान पंतप्रधान मोदींना शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रण देऊन याची सुरुवात करु शकतात. पंतप्रधान मोदींनी देखील सार्क देशांच्या प्रमुखांना आमंत्रित केलं होतं तेव्हा पाकिस्तानचे तत्कालिन पंतप्रधान नवाज शरीफ देखील मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी आले होते.


पाकिस्तानच्या लष्कराचा हस्तक्षेप


नवाज शरीफ जेव्हा पंतप्रधान मोदींच्या शपथविधीसाठी आले होते तेव्हा आमंत्रण स्विकारण्यासाठी त्यांनी बराच वेळ घेतला होता. कारण पाकिस्तानचं लष्कर या विरोधात होतं. पण तरी देखील नवाज शरीफ भारतात आले होते. त्यानंतर त्यांना आज त्यांचे परिणाम देखील भोगावे लागत आहे. आता इमरान खान यांना देखील मोदींना आमंत्रण देण्यासाठी विरोध केला जातो का हे पाहावं लागेल.


भारत-पाकिस्तानमधील चांगल्या संबंधांसाठी बॉल आता इमरान खान यांच्या हातात आहे. आलराउंडर इमरान खान पंतप्रधान म्हणून आता कशी बॅटींग कसे करतात हे पाहावं लागेल.