`या` बलाढ्य देशात २१ दिवसांत ९० हजार कोरोना बळी?
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे.
वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. प्रत्येक देश कोरोना या धोकादायक विषाणूवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक राष्ट्रांमध्ये कोरोना लसीकरण मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे. काही देशांमध्ये रूग्णांची संख्या देखील मंदावत आहे. मात्र अमेरिकेत कोरोना रूग्णांचे प्रमाण दिवसागणिक वाढताना दिसत आहे. शिवाय मृतांच्या आकडेवारीत देखील वाढ होत आहे. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल ऍण्ड कंट्रोलच्या (सीडीसी) इशाऱ्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
अमेरिकेत येत्या तीन आठवड्यात ९२ हजारजणांचा करोनामुळे मृत्यू होण्याची भीती सीडीसीने व्यक्त केली आहे. सीडीसीच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची आणि आरोग्य विभागाचीही चिंता वाढली आहे. शिवाय अमेरिकेतील सरासरी आर्युमानात देखील एक वर्षाची घट झाली आहे.
यंदाच्या महिन्यात अमेरिकेत 30 लाख जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. हे प्रमाण थांबवण्यासाठी फायजर-बायोएनटेक आणि मॉडर्नाने विकसित केलेली लस नागरिकांना देण्यात येत आहे. आतापर्यंत ११.१ दशलक्ष नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे.