लाहोर: हल्लीच्या युगात लोकांपर्यंत तातडीने एखादा संदेश पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा सर्रास वापर केला जातो. यापैकी फेसबुक लाईव्ह हे माध्यम चांगलेच लोकप्रिय आहे. त्यामुळे अनेकदा सरकारी यंत्रणाही एखादी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यासाठी किंवा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फेसबुक लाईव्ह करतात. मात्र, या माध्यमांचा वापर करताना छोटीशी चूकही झाल्यास कशाप्रकारे हसे होऊ शकते, याचा प्रत्यय नुकताच पाकिस्तानमध्ये आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानच्या खैबर-पख्तुनवा प्रांतात सरकारकडून नुकतीच एक पत्रकार परिषद घेण्यात आली. फेसबुकवरून या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण केले जात होते. मात्र, यावेळी चुकून कॅट फिल्टर ऑन झाल्याने मोठा गोंधळ उडाला. पत्रकार परिषदेत कॅमेरा मंत्री आणि अधिकाऱ्यांकडे वळल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर मांजरीचे कान आणि मिशा दिसत होत्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर लगेचच कॅट फिल्टर बंद करण्यात आले. मात्र, तोपर्यंत काही नेटकऱ्यांनी या सगळ्याचे स्क्रीन शॉटस काढले होते. हे स्क्रीन शॉट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या स्क्रीन शॉटसच्या पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही झाल्या आहेत. 


या सगळ्या प्रकारानंतर पाकिस्तान तेहरिक ए-इन्साफ पक्षाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले. हा सर्व प्रकार मानवी चुकीमुळे घडला. भविष्यात असे प्रसंग घडणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल, असेही पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.