मुंबई :  शनिवारी संपूर्ण जगानं उत्साहात, मोठ्या उमेदीनं नवीन वर्षात पाऊल टाकलं. कोरोना नष्ट व्हावा आणि सुख-शांतीच्या शुभेच्छांची देव-घेव झाली. मात्र या क्षणीही चीनची तिरकी चाल समोर आली आहे. 2022  च्या पहिल्याच दिवशी चीनने गलवान खोऱ्यातील एक व्हिडीओ जारी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेला व्हिडीओ त्याच गलवान खोऱ्यातील आहे. जिथं चीननं धोका देऊन भारतीय जवानांवर हल्ला केला होता. या व्हिडीओमधून चीननं सीमेच्या सुरक्षेबाबत भाष्य केलं आहे. या व्हिडीओमध्ये टेकड्यांवर लिहिलेला संदेश हेच सांगतोय की भलेही नवीन वर्ष असो. पण चीनची चाल वाकडीच राहील.


गलवान खोऱ्यात चीनी सैनिक आपल्या देशाचा झेंडा फडकावत आहेत. या टेकड्यांवर चीनी भाषेत एक इंचही जमीन आम्ही देणार नाही असा संदेश लिहिण्यात आला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी चीननं पुन्हा एकदा पोकळ धमक्या सुरूच ठेवल्या आहेत. 


तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये चीनच्या ग्लोबल टाईम्सनं हा व्हिडीओ जारी केला आहे. बर्फाच्छादित टेकड्यांवर चीनचे सैनिक राष्ट्रगीत गात आहेत. यामध्ये एक ड्रोन उडताना दिसतोय. ड्रोनच्या सहाय्यानं राष्ट्रध्वज फडकला आहे. या व्हिडीओमधील ठिकाण आणि वेळ ही कुरघोडी करणारी आहे. 


गलवान खोऱ्यात जून 2020 मध्ये चीनी सैनिक आणि भारतीय सैनिकांमध्ये संघर्ष उडाला होता. भारतीय जवानांनी चीनच्या आक्रमकतेला जशास तसं उत्तर दिलं होतं. चीनचे 40 पेक्षा जास्त सैनिक ठार झाले होते. 


गलवान खोरं भारतीय सैन्याच्या शौर्यांचं प्रतिक आहे. मात्र तरीही चीननं आपला खोटारडेपणा सुरूच ठेवला आहे. गलवानमधून मागे हटणार नाही, असं ते नवीन वर्षात सांगतायेत. 


दोन्ही व्हिडीओ जारी करुन चीननं आपले काळे मनसुबे स्पष्ट केलेत. मात्र चीन हे विसरलाय की भारतासमोर त्याचं काही चालणार नाही. डोकलाम असो की गलवान खोरं, चीनी ड्रॅगनची पिछेहाट झाल्यानेच चिन्यांचा तळतळाट झाला आहे. त्यामुळेच आता अशा व्हिडीओंचा आधार घेतला जात आहे.