भारत-चीन दहावी फेरी संपली; 16 तासांच्या चर्चेदरम्यान भारतानं चीनला सुनावलं
सैन्य माघारीच्या भूमिकेवर भारत ठाम
नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात लष्करी पातळीवरील चर्चेची दहावी फेरी पार पडली. तब्बल 16 तास झालेल्या या चर्चेत सैन्य माघारीच्या मुद्द्यावरुन भारतानं चीनला सुनावलं. या बैठकीत हॉट स्प्रिंग्ज, गोग्रा, देपसांग, या पूर्व लडाख भागातील चीनी सैन्यानं माघार घ्यावी अशी मागणी भारतानं लावून धरलीये. दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी या चर्चेचा लाभ होईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनच्या हद्दीतील मोल्दो येथे ही बैठक झाली.
गलवान खो-यात भारतीय सैन्याबरोबर झालेल्या झटापटीत चीनचे ४५ सैनिक मारले गेले होते. मात्र यावर चीननं पहिल्यांदाच भाष्य केलंय. पाच सैनिक मारले गेल्याचं म्हटलंय. चीनचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगासमोर समोर आला आहे. दरम्यान, दोन्ही देशा दरम्यान कमांडर स्तरावर चर्चेची दहावी फेरी होतेय.
गेल्यावर्षी जून महिन्यात लडाखच्या गलवान खो-यात भारत आणि चीनच्या सैनिकांची जोरदार झटापट झाली. यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले. चीननं मात्र त्यांचे नेमके किती जवान मारले गेले, हे कधीच जाहीर केलं नाही. अखेर 8 महिन्यांनी चीनच्या ग्लोबल टाईम्स या सरकारी वृत्तपत्रानं गलवानमध्ये एका अधिकाऱ्यासह 5 सैनिक मारले गेल्याचं म्हटलंय. मात्र सैनिक मारले गेल्याची कबुली देताना चीननं पुन्हा एकदा खोटारडेपणा केला आहे.
जगभरातील अनेक देश, रशियाची 'तास' ही मीडिया एजन्सी चीनचे किमान 45 सैनिक मारले गेल्याचं सांगत असताना केवळ 5 जण ठार झाल्याचं सांगून लपवाछपवी सुरूच ठेवली आहे. या वृत्तपत्रानं झटापटीचा एक व्हिडिओदेखील जारी केला आहे. या व्हिडीओत दिसणारा क्युई फबाओ हा रेजीमेंट कमांडर गलवानमध्ये मारला गेल्याचा दावा ग्बोबल टाईम्सनं केला आहे.
भारत-चीन दरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असलेला तणाव आता निवळतो आहे. १० फेब्रुवारीपासून पँगाँग लेक परिसरातून दोन्ही सैन्य मागे हटतायत. अशा वेळी चिनी वृत्तपत्रानं दिलेली ही कबुली महत्त्वाची मानली जात असली तरी नेहमीच्या सवयीप्रमाणे हातचं राखून ठेवलंच आहे. जनतेला नेमके किती सैनिक मारले गेले हे समजू नये आणि जगात आपली नाचक्की होऊ नये, यासाठी तिथल्या हुकुमशाही सरकारचा आटापिटा सुरूच आहे.