भारत-चीन तणाव । भारताकडून बंदोबस्तात वाढ, चीन पुन्हा बिथरला
भारत-चीन तणावाच्यावेळी भारतीय फौजांनी आक्रमक धोरण अवलंबले आहे. चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी व्युहरचना करण्यात येत आहे.
नवी दिल्ली : भारत-चीन तणावाच्यावेळी भारतीय फौजांनी आक्रमक धोरण अवलंबले आहे. चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी व्युहरचना करण्यात येत आहे. पँगाँग त्सो तलाव भागाच्या दक्षिणेकडील अतीमहत्त्वाच्या पोस्टवर भारताने बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. पँगाँग त्सो तलाव परिसरातली जैसे थे स्थिती बदलण्याचा पीएलएचा डाव हाणून पाडल्यावर आता भारताने इथे तैनात वाढवली आहे.
भारत आणि चीन यांच्यातला तणाव निवळण्यासाठी बुधवारीही तब्बल सात तास लष्करी चर्चा झाली. मात्र या चर्चेतूनही कोणताही तोडगा निघाला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार भारताने परिसरातल्या अनेक महत्त्वाच्या शिखरांना ताब्यात घेऊन त्यावर फौजा तैनात केल्या आहेत. त्यामुळे चीन पुन्हा बिथरला आहे.
पूर्वेकडील लडाखमधील पँगाँग तलावाच्या दक्षिण भागात चीनच्या पीएलएच्या स्थितीत बदल करण्याचा प्रयत्न केल्याच्या दोन दिवसानंतर भारतीय लष्कराने मोठ्याप्रमाणात बंदोबस्तात वाढ केली आहे. आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती फारच ताणलेली आहे. दोन्ही देशांत लष्करी चर्चा सुरू असतानाही चीन पुन्हा "चिथावणीखोर" कारवाईत करण्यात गुंतला आहे आणि पीएलएच्या द्विपक्षीय बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे भारताने म्हटले आहे.
दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर असल्याने लडाखची परिस्थिती आता अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. दोन्ही राष्ट्राचे सैनिक एकमेकांच्या गोळीबाराच्या टप्प्यात आहेत. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे, परंतु काहीही होऊ शकते, असे 'डीएनए' अहवालात स्पष्ट केले आहे.
दोन आशियाई शेजार्यांच्या सैन्या समोरासमोर उभ्या राहिल्यामुळे चीनपुढे काय पर्याय उरले आहेत, असा प्रश्न पडतो. अशा परिस्थितीत तीन पर्याय शिल्लक राहतील असे समजल्या जाणार्या चीनची पुढची पायरी काय असेल? प्रथम चीनी पीएलएने परत यावे; दुसरे म्हणजे चीनने युद्धासाठी सज्ज राहिले पाहिजे; तिसरा पर्याय म्हणजे दोन्ही सैन्याने यथास्थिती कायम ठेवली पाहिजे.
पीएलएच्या पूर्वेकडील लडाखमध्ये उल्लंघन करण्याच्या प्रयत्नास भारतीय लष्कराच्या प्रतिक्रियेबद्दल चीन हैराण झाले आहे. चीनने लडाखमधील . पँगाँग त्सो तलावाच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर कब्जा करण्याचे नियोजन केले होते, परंतु २९ आणि ३० ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी चीनची पोलखोल झाली.
आता या भागातील चिनी सैन्याच्या तुलनेत भारत उच्च आणि मजबूत स्थितीत आहे. यामुळे पीएलएला एवढा मोठा धक्का बसला आहे की गेल्या २४ तासांत चीनने पाच वेगवेगळी विधाने केली. भारताने आपल्या प्रदेशात प्रवेश केला आहे आणि सैन्य परत मागवावे, असे हे वारंवार सांगण्यात आले आहे.
यापैकी एका निवेदनात चीनने म्हटले आहे की, दुसर्या देशाच्या एक इंच जागेवरही कब्जा करायचा नाही. चीनचा सध्या भारतासह १८ देशांशी सीमा विवाद आहे. यावरून हे स्पष्ट होते की भारताच्या कारवाईने चीनला इतर देशांच्या सीमेचा आदर करण्याविषयी बोलण्यास भाग पाडले आहे.