नवी दिल्ली : पाकिस्तान सरकारमध्ये धार्मिक व आंतर विश्वास सलोखा या विभागाची जबाबदारी सांभाळणाऱ्या साहिबजादा नूर अल हक कादरी यांनी सोमवारी भारताविषयी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. भारताकडून ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती या सुफी संतांच्या उर्सच्या निमित्ताने येण्यास इच्छुक असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना / भाविकांना व्हिसा नाकारण्यात आल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. मार्च महिन्यातच अजमेर शरीफ येथील दर्ग्यात हा उत्साह पार पडणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


'द डॉन'ला दिलेल्या माहितीत पाकिस्तानच्या या मंत्र्यांनी जवळपास ५०० भक्तांना व्हिसा नाकारला आहे. हे सर्वजण ७ मार्चला भारताच्या रोखाने प्रवासाला सुरुवात करणार होते. पुलवामा हल्ल्याच्या नंतर भारत- पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या तणावपूर्ण वातारणाच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती उदभवली आहे. पुलवामा हल्ला, त्यानंतर भारतीय वायुदलाकडून पाकव्याप्त काश्मीरकमध्ये करण्यात आलेला एअर स्ट्राईक, याचं उत्तर म्हणून पाकिस्तानच्या हवाई दलाकडून करण्यात आलेला घुसखोरीचा प्रयत्न या सर्व घटनांचे पडसाद आता विविध रुपांमध्ये पाहायला मिळत आहेत. 


'अखेर भारताचा कट्टरतावादी चेहरा समोर आला आहे', असं म्हणत भारतात धर्माच्या नावाखाली असणाऱ्या कट्टरतावादावर त्यांनी वक्तव्य केलं. कादरी इतक्यावरच न थांबता त्यांनी, पुढे हा प्रकार दुसऱ्यांदा घडला असल्याचं सांगितलं. यापूर्वीही पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या भाविकांना व्हिसा नाकारण्यात आला होता, ही बाब त्यांनी उघड केली.


गेल्या वर्षी मार्च महिन्यात भारताकडून जवळपास ५०३ भाविकांना उर्सच्या निमित्ताने येण्यासाठीचा व्हिसा नाकारण्यात आला होता. नवी दिल्लीतील हजरत निजामुद्दीन औलिया येथे असणाऱ्या उर्सच्या निमित्ताने भारतीय दूतावासाकडून फक्त १९० पाकिस्तानी भाविकांच्याच व्हिसाला परवानगी देण्यात आली होती, असं कादरी म्हणाले. इस्लामाबादमध्ये असणाऱ्या भारतीय दूतावासाकडूनच भारताकडून या व्हिसासाठीची परवानगी नाकारण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. अद्याप दूतावासाकडून संबंधित नागरिक/ भाविकांचे व्हिसा मिळण्यासाठी केलेल्या अर्जासोबत देण्यात आलेले पासपोर्ट परत येण्याचं बाकी आहे.