जपानच्या मदतीने भारत पुन्हा एकदा करणार चंद्रावर स्वारी; ISRO आणि JAXA यांचा जबरदस्त प्लान
भारत आणि जपान एक संयुक्त मून मिशन राबवणार आहे. चंद्रावर पाण्याचा शोध घेणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे.
Japan Mission News: भारताची चांद्रयान 3 मोहिम जवळपास यशस्वी झाली आहे. तर, जपानने आपले स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) अर्थात मून स्नायपरने आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) चंद्रावर पाठवले आहे. जपानच्या मदतीने भारत पुन्हा एकदा करणार चंद्रावर स्वारी करणार आहे. भारताची अंतराळ संस्था ISRO आणि जपानी स्पेस एजन्सी JAXA हे संयुक्तरित्या एका चंद्र मोहिमेवर काम करत आहेत. 2025 मध्ये ही मोहिम प्रत्यक्षात साकार होणार आहे.
ISRO आणि JAXA यांची संयुक्त मोहिम
जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA) भारतासोबत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ही चंद्र मोहीम राबवणार आहे. भारताच्या सहकार्याने जपान रोव्हर तयार करत आहे. 2019 मध्ये JAXA आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांनी या प्रकल्पासाठी सहमती दर्शवली होती. चंद्रावर पोहोचणारा भारत हा चौथा देश आहे. तर, दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. ISRO आणि JAXA यांच्या संयुक्त चंद्र मोहिमेत भारत लँडर तयार करणार आहे. तर JAXA लॉन्चिंगचे काम करणार असून यासाठी रोव्हर तयार देखील तयार करणार आहे. लूनर पोलर एक्सप्लोरेशन (LUPEx) असे या मोहिमेचे नाव आहे.
2025 मध्ये मोहिम यशस्वी करण्याचे उद्दिष्ट
2025 मध्ये मोहिम यशस्वी करण्याचे उद्दिष्ट ISRO आणि JAXA यांनी ठेवले आहे. जपानच्या नवीन H3 रॉकेटच्या मदतीने ही मोहिम यशस्वी केली जाणार आहे. जपान विकसीत करत असलेल्या रोव्हरचे डिजाईन प्राथमिक टप्प्यात आहे. या रोव्हरची वाळूमध्ये चाचणी केली जात आहे. ही वाळू चंद्राच्या बारीक धूळ रेगोलिथ सारखी आहे. चंद्रावर हा रोव्हर या वाळूमध्ये कशा प्रकारे काम करेल याची चाचणी केली जात आहे.
चंद्रावर पाण्याचा शोध घेणार
चंद्रावर पाण्याचा शोध घेणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. हा रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचे प्रमाण आणि गुणवत्तेची तपासणी करणार आहे. ड्रिलिंगद्वारे काढलेल्या नमुन्यांचे रोव्हरमध्ये बसवलेल्या उपकरणांद्वारे विश्लेषण केले जाणार आहे. भविष्यात चंद्रावर मानवी वसाहती स्थापन करण्यासाठी हा डेटा अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. ISRO आणि JAXA यांच्या संयुक्त चंद्र मोहिमेत अनेक देश देखील अप्रत्यक्षरित्या सहभागी होणार आहेत. अनेक देशांच्या अंतराळ संस्था आपले पेलोड अर्थात उपकरण पाठवणार आहेत. नासाचे न्यूट्रॉन स्पेक्ट्रोमीटर हे पेलोड दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागाच्या 3.3 फूट खाली हायड्रोजनचा शोध घेणार आहे. तर, युरोपियन स्पेस एजन्सीचे एक्सोस्फेरिक मास स्पेक्ट्रोमीटर हे पेलोड चंद्राच्या पृष्ठभागावरील वायूंचा दाब आणि त्यांच्या रासायनिक बदलांचे निरीक्षण करणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असू शकते असे यापूर्वीच्या अनेक विश्लेषणातून दिसून आले आता थेट या अनुषंगाने संशोधन केले जाणार आहे.