नवी दिल्ली : चीनकडून लद्दाख येथे भारतीय सीमेवर मोठ्या संख्येने सैन्य तैनात केल्यानंतर भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय लष्कराने लद्दाखमध्ये चीनच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात जवानांना तैनात केलं आहे. चिनी सैन्याची घुसखोरी रोखण्यासाठी भारताने लद्दाखसह इतर भागात गस्त कडक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनमधील डीबीओ आणि 114 ब्रिगेडच्या शेजारच्या भागात 5000 सैनिक तैनात केले आहेत. चिनी सैनिकांना कोणत्याही प्रकारे पुढे येण्यापासून रोखण्यासाठी भारतीय सैन्याने हवाई दलाच्या मदतीने अग्रेसर भागात तैनात केले आहे.


चिनी सैनिकही खूप आक्रमकतेने काम करत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यांनी पँगोंग लेक आणि फिंगर भागात अवजड वाहने तसेच बांधकाम उपकरणे आणली आहेत. गालवान क्षेत्रात भारत आपल्या सीमांना जोडण्यासाठी रस्ता तयार करत आहे. शुक्रवारी या बांधकामावर चीनने आक्षेप घेतला, त्यानंतर चीनने या भागात 800 ते 900 सैनिक तैनात केले आहेत. ज्यांनी तेथे राहण्यासाठी सुमारे 90 टेंट बनवले आहेत.


चिनी सैन्यांकडून तैनात करण्यात आलेली सैनिकांची संख्या पाहता आता भारताने ही या भागात सैन्य वाढवलं आहे. भारताने रोडवे आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने ए ग्रिम भागात अधिक सैन्य पाठवले आहे. लद्दाखमध्ये भारताने गस्त वाढवली आहे. तसेच, गेल्या काही वर्षांत चीनने अतिक्रमण केलेल्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील सीमावर्ती भागातही गस्त घातली जात आहे. सिक्कीम सेक्टरमध्ये ही सैनिक वाढवण्यात आले आहेत. चिनी सैन्याकडून कोणतीही घुसखोरी रोखण्यासाठी सैनिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


चीनने आपले सैन्य वाहतूक करण्यासाठी आणि भारतीय सीमेजवळील गालवण भागात वस्तू पुरवण्यासाठी अनेक रस्ते बांधले आहेत. हे लक्षात घेता भारताने देखील या भागातील सीमेपर्यंत जाण्यासाठी रस्ते बांधणीच्या कामांना वेग दिला होता, यावर चीनने आक्षेप घेतला आहे. दोन्ही बाजूंकडून सैन्य पेट्रोलिंगही वाढविण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी पूर्व लद्दाख आणि सिक्कीमच्या नाकूला सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये बाचाबाची झाली होती.