न्यूयॉर्क: संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताविरुद्ध गरळ ओकली. त्यांच्या या कृतीचा निषेध म्हणून संयुक्त राष्ट्रसंघातील भारतीय प्रतिनिधींनी इम्रान खान यांच्या भाषणावर बहिष्कार टाकला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा संयुक्त राष्ट्रांची आमसभा UN General Assembly hall व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी इम्रान खान यांनीदेखील आमसभेला संबोधित केले. मात्र, या भाषणात त्यांनी भारतावर अनेक खोटे आरोप केले. इम्रान खान यांनी राजनैतिक शिष्टाचार डावलत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि काश्मीरच्या मुद्द्यावरून भारताला लक्ष्य केले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांनी म्हटले की, पाकिस्तान आणि पाकिस्तानची जनता आपल्या काश्मिरी बंधू भगिनींनी सुरू केलेल्या संघर्षाचं समर्थन करते आणि त्यांच्यासोबत राहण्यास कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. पाकिस्तान सरकारद्वारे कोणत्याही हल्ल्यात सहभागी असल्याच्या आरोपांचे खंडन करत त्यांनी याचा खोटा प्रचार सुरू असल्याचा कांगावा केला.

त्यावेळी भारताकडून इम्रान खान यांच्या भाषणावर बहिष्कार टाकण्यात आला. भारतीय प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती भाषण सुरु असताना असेंबली हॉलमधून बाहेर पडले. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलेले विधान कूटनितीक दृष्टीने अतिशय खालच्या पातळीचे असल्याची टीका यावेळी एस. तिरूमूर्ती यांनी केली.


 



यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेच्या अधिवेशनात भारताकडून इम्रान खान यांच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले. जे दहशतवादाची नर्सरी आणि दहशतवादाचे केंद्र म्हणून ओळखल्या जातात अशा देशाकडून जगाला मानवाधिकारांवर धडे घेण्याची गरज नाही, असे खडे बोल भारताने पाकिस्तानला सुनावले.