कॅलिफोर्नियात भारतीय कुटुंब मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. हे कुटुंब मूळचं केरळचं असून सॅन मॅटेओ शहरात ते वास्तव्यास होतं. पोलिसांना पती-पत्नीच्या शरिरावर बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा आढळल्या आहेत. पोलीस याप्रकरणी तपास करत असून हे हत्या-आत्महत्या प्रकरण असल्याचा संशय आहे. NBC Bay Area ने दिलेल्या रिपोर्टनुसार, मृतांची ओळख पटली आहे. आनंद सुजीत हेन्री (42), त्यांची पत्नी अॅलिस प्रियांका बेंजिगर (40) आणि त्यांच्या 4 वर्षाच्या जुळ्या मुलांचा यात समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुटुंब काहीही उत्तर देत नसल्याने अधिकाऱ्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात आलं होतं. Alameda de las Pulgas वरील 4100 block ते वास्तव्यास होते. अधिकारी पोहोचले असता त्यांना घरात जबरदस्ती घुसखोरी झाल्याची कोणतीही खूण आढळली नाही. पण एक खिडकी उघडी असल्याचं आढळलं. याच खिडकीतून ते अधिकारी आत गेले. यावेळी त्यांना घरात मृतदेह सापडले. 


पती आणि पत्नीचा मृतदेह बाथरुममध्ये होता. त्यांच्या शरिरावर बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा होत्या. त्यांच्या मृतदेहाशेजारी 9mm ची पिस्तूल आणि भरलेली मॅगजिन होती. दोन्ही जुळ्या मुलांचे मृतदेह बेडरुममध्ये होते. मुलांचा मृत्यू नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पण त्यांना गुदमरुन किंवा गळा दाबून अथवा विष देऊन मारुन टाकलं असावं अशी शंका आहे. कारण त्यांच्या शरिरावर कोणतीही जखम किंवा खूण आढळलेली नाही. 


कोर्टात मिळालेल्या नोंदीनुसार, आनंदने डिसेंबर 2016 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. पण प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. पोलिसांना याआधीही घरातून फोन आले होते. पण त्याची सविस्तर माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळी पोलिसांनी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. मृत्यू नेमके कसे झाले आणि त्यामागे काय कारण होतं हे अद्याप उघड झालेलं नाही. 


आनंद आणि अॅलिस हे दोघेही आयटीत काम करत होते. गेल्या 9 वर्षांपासून ते अमेरिकेत वास्तव्यास होते. आनंद सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. तर अॅलिस सिनिअर अॅनालिस्ट होती.