नसीरुद्दीन शहा यांचं तालिबान आणि मुसलमानांवरील वक्तव्य एकाला गोड दुसऱ्याला कडू का?
तालिबान्यांच्या जल्लोष करणाऱ्यांवर ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी चांगलाच संताप व्यक्त केलाय.
मुंबई : तालिबान्यांनी पूर्णपणे अफगाणिस्तान ताब्यात घेतलंय. अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबान्यांवर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. मात्र काही जण हे त्यांचं कौतुकही करतायेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही तालिबान्यांचं तोंडभरून कौतुक केलं. तालिबान्यांच्या या विजयावर अनेकांनी जल्लोष केला. या जल्लोष करणाऱ्यांवर ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह यांनी चांगलाच संताप व्यक्त केलाय. शाह यांनी व्हीडिओ ट्विट करत खडेबोल सुनावले. दरम्यान या व्हीडिओवरुन आता नव्या वादाला तोंड फुटलंय. (Indian film actor Naseeruddin Shah slam muslim to celebrate talibans victory on afghanistan)
तालिबान्यांच्या विजयावर काही मुस्लिमांनी जल्लोष केला. या जल्लोष करणाऱ्यांना शाह यांनी व्हीडिओतून सुनावलंय. जल्लोष करुन चुकीचा पायंडा पाडला जातोय. शाह यांनी केलेल्या विधानामुळे मुस्लिमांमध्ये नाराजीचा सूर आहे. तसेच शाह यांनी चुकीच्या पद्धतीने तुलना केलीय, असा आरोप त्यांच्यावर केला जातोय.
व्हीडिओत नक्की काय म्हटलंय?
नसरूद्दीन शाह यांनी उर्दुत व्हीडिओ शेअर केला आहे. "आधुनिक इस्लाम धर्म हवाय की की काही दशकांपूर्वी रुढी परंपरेत अडकलेला इस्लाम धर्म हवाय, असा प्रश्न तालिबान्यांच्या विजयाचं जल्लोष करणाऱ्यांनी स्वत:ला विचारायला हवा", असं शाह यांनी म्हटलंय.
तालिबानने 1996 आणि 2001 मध्ये अफगाणिस्तानवर नियंत्रण ठेवत इस्लामी नियमांची सक्तीने अंमलबजावणी केली. या दरम्यान लोकांना फाशी देण्यात आली. तसेच महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवलं. तसेच काम करण्यावर प्रतिबंध घालण्यात आला.
भारतीय इस्लाम जगातील इस्लामापेक्षा वेगळा
"भारतीय इस्लाम हा नेहमीच जगातील प्रचलित इस्लामापेक्षा वेगळा राहिला आहे. पण अशी वेळ ओढावू नका, की त्यात इतका बदल होईल की आपल्याला त्याला ओळखताही येणार नाही", असंही शाह यांनी नमूद केलं.
मी भारतीय मुसलमान आहे, असं शाह यांनी नमूद करताना त्यांनी मिर्जा गालिब यांचा शेरचंही उदाहरण दिलं. "मी एक भारतीय मुसलमान आहे. मला राजकीय धर्माची गरज नाही, असं शाह यांनी स्पष्ट केलं. दरम्यान शाह यांनी केलेल्या विधानामुळे संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसतायेत.