...अन् पाकिस्तानात हामीदला मिळाली आईची माया
त्याची मदत करण्यासाठी पुढे सरसावलेल्या `या` व्यक्ती
मुंबई : मुळचा वर्सोवा येथील असणारा सॉफ्टवेअर इंजिनिअर हामीद अन्सारी जवळपास सहा वर्षांनंतर मायदेशी परतला आहे. बनावट पाकिस्तानी ओळखपत्र बाळगल्याच्या आरोपावरुन त्याला पाकिस्तान लष्करी न्यायालयाने कारावासाची शिक्षा सुनावली होती. पण, अखेर बऱ्याच प्रयत्नांनंतर मंगळवारी वाघा बॉर्डर येथून त्याने पुन्हा भारतात पाऊल ठेवलं.
एका पश्तून मुलीच्या प्रेमाखातर हामीदने थेट देशाची सीमा ओलांडली होती. पण, त्याच्या आयुष्यात असं वळण आलं की त्याला सीमेपलीकडेच कारावास भोगावा लागला. हामीदच्या येण्यामुळे पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये एक सकारात्मक उर्जेचा आणि आशेचा किरण पाहायला मिळत आहे.
'नवभारत टाईम्स'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार हामीद फेसबुकच्या माध्यमातून एका पश्तून मुलीच्या प्रेमात पडला होता. ज्यानंतर त्याने पाकिस्तानात जाण्याचे प्यत्न सुरु केले. त्यासाठी त्याने ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई यांचीही भेट घेतली होती. हे तेच जतन देसाई आहेत, ज्यांनी हामीदला भारतात परत आणण्यामध्ये मोलाचं योगदान दिलं आहे.
दोन्ही राष्ट्रांमध्ये शांततेचे संबंध कायम रहावेत यासाठी देसाई यांनी आपलं योगदान दिलं आहे. 'पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमॉक्रसी' (PIPFPD) च्या महासचिवपदी असणाऱ्या देसाई यांनी प्रेस क्लब ऑफ मुंबई आणि कराची प्रेस क्लबमध्ये शांती चर्चा सुरु केली होती. 'मुंबई मिरर'शी संवाद साधताना देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार हामीद पाकिस्तानात जाण्याच्या जवळपास सहा महिन्यांपूर्वी त्यांना भेटला होता. ज्यावेळी हामीदने आपण पख्तून ख्वा या भागातील मुलीशी लग्न करण्याच्या विचारात असल्याची बाब सांगितली होती तेव्हा तेही मिश्किलपमे हसले होते. हे सर्व विचार सोडून भविष्याचा आणि करिअरचा विचार करण्याचा सल्ला त्यांनी त्याला दिला होता.
हामीद मात्र त्याच्या निर्णयावर ठाम होता. एके दिवशी वृत्तपत्रांच्या माध्यमातून तो पाकिस्तानमध्ये चुकीच्या मार्गाने गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. ज्यावेळी हगामीदला भारतात आणण्याचे मार्ग बंद होऊ शकतात ही बाब त्यांच्या लक्षात आली तेव्हाच त्यांनी याविषयीची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली आणि स्वत:च्या ओळखीच्या लोकांना संपर्क साधत त्याला मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न सुरु केले.
पाकिस्तानच्या कारागृहात मिळाली आईची माया....
हामीद मायदेशी परतण्यामध्ये पाकिस्तानी नागरिकांचाही मदतचा हात होता. रक्षंदा नाज आणि काझी मोहम्मद अन्वर अशी त्या व्यक्तींची नावं आहेत. हे दोघंही पाकिस्तानमध्ये मानवाधिकार वकील आहेत. हामीदचं हे संपूर्ण प्रकरण ज्यावेळी त्यांच्यापर्यंत पोहोचलं तेव्हा ते अतिशय क्लिष्ट झालं होतं. १२ डिसेंबर २०१५ ला पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हामीदला हेरगिरी आणि पाकिस्तानविरोधी कारवायांसाठी दोषी ठरवलं होतं.
हामीद निर्दोष असल्याची खात्री त्याला पाहताच रक्षंदा आणि काझी मोहम्मद अन्वर यांना झाली होती. ज्यानंतर त्यांनी कोणतंही मानधन न आकारता त्याचा खटला लढला. एकिकडे अन्वर त्याची निर्दोष सुटका करण्यासाठी वारंवार न्यायालयाकडे आपली बाजू मांडत होते. तर, दुसरीकडे रक्षंदा यांनी आपल्या मुलाप्रमाणे त्याची काळजी घेतली. कारागृहात त्या नेहमीच हामीदची भेट घेण्यासाठी जात. सोबत त्याच्यासाठी खाण्याचे पदार्थही नेत असत.
हामीदच्या सुटकेत आणखी एका व्यक्तीची महत्त्वाची भूमिका
पाकिस्तानमधील मानवी हक्कांसाठी लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि स्थानिक पत्रकारांचीही हामीदला फार मदत झाली. ज्यामध्ये पत्रकार झीनत शहजादी यांच्याही नावाचा समावेश आहे. हामीदच्या आईने आपल्या मुलाची सुटका व्हावी यासाठी शहजादी यांच्याशी संपर्क साधला होता. हामीद प्रकरणावर काम करतेवेळी झीनत जवळपास दोन वर्षे कोणाच्याच संपर्कात नव्हती. जवळपास दोन वर्षांनी त्यांचा शोध लागला. ज्यानंतर त्यांचं अपहरण करण्यात आल्याची माहिती समोर आली.
हामीदचं भारतात परतणं त्याच्या कुटुंबीयांसाठी जितकं सुकट आहे तितकंच ते संपूर्ण देसासाठीही सुखद आणि एक सकारात्मक दृष्टीकोन देणारं आहे. शेजारी राष्ट्रामधील नागरिकांची आणि जतिन देसाई यांची त्याला झालेली मदत ही तितकीच महत्त्वाची आहे.