MV Lila Norfolk Hijacked : आफ्रिकन देश सोमालियाच्या किनाऱ्याजवळ एका मालवाहू जहाजाचे अपहरण झाल्याची बातमी समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. या जहाजावर 15 भारतीय क्रू मेंबर्स असल्याची माहिती समोर आल्यानंतर भारतीय नौदल अॅक्शन मोडमध्ये आली होती. भारतीय नौदल अपहरण झालेल्या जहाजाच्या आसपासच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. त्यानंतर आता अपहरण करण्यात आलेल्या जहाजावरील 15 भारतीयांसह सर्व 21 क्रू मेंबर्सची भारतीय नौदलाने सुटका केली आहे. अपहरणानंतरच भारतीय नौदलाने सोमालियाच्या किनाऱ्याजवळ कारवाई सुरू केली होती. यानंतर कमांडोज जहाजावर उतरले तेव्हा समुद्री चाचे पळून गेले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय नौदलाच्या एलिट मरीन कमांडो मार्कोसच्या मदतीने अरबी समुद्रात सोमालियाच्या किनाऱ्याजवळ एमवी लीला नॉरफॉक (MV Lila Norfolk) या अपहरण झालेल्या मालवाहू जहाजातून 15 भारतीयांसह सर्व 21 क्रू सदस्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. पाच-सहा सशस्त्र दरोडेखोरांनी या जहाजाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर नौदलाने कारवाई पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. नौदलाच्या म्हणण्यानुसार, एमपीएकडून इशारा मिळाल्यानंतर समुद्री चाच्यांनी जहाज अपहरण करण्याची त्यांचा निर्णय मागे घेतला असावा.


भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी अरबी समुद्रात भारतीय युद्धनौकांना चाच्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून या भागातील व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी भारतीय नौदलाच्या चार युद्धनौका अरबी समुद्रात तैनात करण्यात आल्या आहेत. 


कशी झाली सुटका?


एडनच्या आखातातील या कारवाईचा एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडीओमध्ये भारतीय नौदलाचे मरीन कमांडो या कारवाईसाठी मालवाहू जहाजात प्रवेश करताना दिसत आहेत. सागरी सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी काम करणाऱ्या UKMTO या संस्थेने अपहरण झालेल्या जहाजाची माहिती भारताला दिली होती. क्रूने पाठवलेल्या संदेशात पाच ते सहा सशस्त्र लोक जहाजावर चढल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे भारतीय नौदलाने तात्काळ कारवाई केली.सोमालियाजवळ अडकलेल्या या जहाजाकडे आयएनएस चेन्नईला पाठवण्यात आले होते.


आधी भारतीय नौदलाने या जहाजाच्या दिशेने सागरी पेट्रोलिंग विमान P8I पाठवले. त्यानंतर आयएनएस चेन्नईला देखील व्यापारी जहाजाच्या संरक्षणासाठी पाठवले गेले. भारतीय नौदलाने अपहरण करणाऱ्या चाच्यांना सक्त ताकीद दिली होती. यानंतर नौदल कमांडो येण्यापूर्वीच ते जहाज सोडून पळून गेले.


दरम्यान, मार्कोस कमांडोच्या या बचाव मोहिमेवर नौदल लाइव्ह फीडद्वारे लक्ष ठेवून होते. भारतीय नौदलाचे अधिकारी दलाच्या MQ-9B प्रीडेटर ड्रोनने पाठवलेल्या फीडचा वापर करून नौदल मुख्यालयातून थेट ही कारवाई पाहत होते.