अमेरिकेतील न्यू जर्सी येथे भारतीय वंशाचं कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पती-पत्नीसह दोन मुलं राहत्या घऱात मृतावस्थेत आढळली. तेज प्रताप सिंग (43), सोनल परिहार (42) यांच्यासह त्यांचा 10 वर्षांचा मुलगा आणि 6 वर्षांची मुलगी यांचे मृतदेह पोलिसांना बुधवारी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास आढळले. प्राथमिक अंदाजानुसार कुटुंबाची हत्या करण्यात आल्याचं दिसत आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 ऑक्टोबरला 911 क्रमाकांवर फोन करत प्लेन्सबोरो येथील घऱात जाऊन तपासणी करण्याची विनंती करण्यात आली होती. पोलीस तिथे पोहोचले असता घऱात चार मृतदेह पडले होते. या प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे. तसंच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी यावेळी परिसरातील कोणाकडे काही माहिती किंवा सीसीटीव्ही असेल तर माहिती देण्याचं आवाहन केलं आहे. 


मेयर पीटर कँटू आणि सार्वजनिक सुरक्षा संचालक इमोन ब्लैंचर्ड यांनी एक निवेदन जारी करत, या घटनेनंतर आम्ही सर्व शोकात असल्याचं म्हटलं आहे. "या दु:खद घटेनेने आम्ही सारे व्यथित आहोत. जे काही झालं आहे ते भरपाईच्या पलीकडचं आहे," असं त्यांनी निवेदनात लिहिलं आहे. 


न्यूज 12 न्यू जर्सीच्या फुटेजवरुन गुरुवारी सकाळपर्यंत टायटस लेनमधील कुटुंबाच्या घऱाच्या लॉनवर अद्यापही क्राइम सीन टेप लावण्यात आल्याचं दिसत आहे. कुटुंबाच्या नातेवाईकाने पोलिसांना फोन केल्यानंतरच ही घटना उघडकीस आली. पोलीस या प्रकरणाचा तपास करताना हत्या-आत्महत्या या बाजूनेही विचार करत आहे. 


दरम्यान नातेवाईकांनी सीबीएस न्यूजशी संवाद साधताना आपल्याला फार मोठा धक्का बसल्याचं म्हटलं आहे. तेज प्रताप सिंग आणि सोनल परिहार हे आनंदी जोडपं वाटायचं. तेज प्रताप सिंग हा समुदायात नेहमी सक्रीय असे. 


तेज प्रताप सिंगच्या लिंक्डइन प्रोफ़ाइलनुसार, नेस डिजिटल इंजीनियरिंगसाठी लीड एपीआईएक्स इंजिनिअर म्हणून काम करत होता. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, तेज प्रताप सिंग आणि सोनल परिहार दोघेही आयटी आणि एचआर क्षेत्रात काम करत होते. 


रेकॉर्डवरुन मिळालेल्या माहितीनुसार, तेज प्रताप सिंग आणि सोनल परिहार यांनी 2018 मध्ये 635,000 अमेरिकन डॉलर्समध्ये घर खरेदी केलं होतं. हे कुटुंब मिळून मिसळून राहायचं असं शेजाऱ्यांनी सांगितलं आहे. तसंच अनेकदा ते शांतपणे येथील रस्त्यांवर फिरत असत. एका शेजाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं की, गेल्या एक दशकापासून त्याचे कुटुंबासह मैत्रीपूर्ण संबंध होते.