मूळ भारतीयाला गणितातला नोबल `फिल्ड्स मेडल` प्रदान
त्यांच्यापूर्वी हा पुरस्कार २०१४ मध्ये मंजुल भार्गव यांना प्रदान करण्यात आला होता
रिओ दी जेनेरिओ : मूळ भारतीय गणितज्ज्ञ अक्षय व्यंकटेश यांचा 'फिल्ड्स मेडल' सन्मानानं गौरव करण्यात आलाय. 'फिल्ड्स मेडल' हा गणित क्षेत्रातला सर्वोच्च नोबल पुरस्कार मानला जातो. रिओ दी जेनेरिओमध्ये बुधवारी गणितज्ज्ञांच्या आंतरराष्ट्रीय सभेत ३६ वर्षीय व्यंकटेश यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. चार वर्षांत एकदा फिल्डस मेडल ४० हून कमी वय असणाऱ्या उभरत्या गणितज्ज्ञांना दिला जातो.
अक्षय व्यंकटेश हे स्टॅनफोर्ड विश्वविद्यालयात प्रोफेसर आहेत. हा पुरस्कार पटकावणारे ते दुसरे मूळ भारतीय व्यक्ती ठरलेत. त्यांच्यापूर्वी हा पुरस्कार २०१४ मध्ये मंजुल भार्गव यांना प्रदान करण्यात आला होता.
व्यंकटेश हे मूळ भारतीय असले तरीही त्यांनी ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व मिळवलंय. केवळ १३ व्या वर्षी त्यांनी 'युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया'मध्ये गणित आणि फिजिक्समध्ये डिग्री मिळवली होती. ३६ वर्षीय व्यंकटेश 'नंबर थिअरी'मध्ये तज्ज्ञ आहेत.
अन्य तीन विजेत्यांमध्ये केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर कौचर बिरकर (४० वर्ष), स्विस फेडरल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजीचे एलिसो फिगाली (३४ वर्ष) आणि बॉन युनिव्हर्सिटीचे पीटर स्कूल्ज यांचा समावेश आहे. सर्व विजेत्यांना सोन्याचं मेडल आणि रोख १५,००० कॅनडियन डॉलरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.