पेटत्या कारमध्ये मैत्रिणीला सोडून त्याने काढला पळ
एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे
न्यूयॉर्क : कारमध्ये अपघातानंतर आग लागल्याची घटना तुम्ही पाहिली असेल किंवा ऐकली असेल. कारमध्ये आग लागल्यानंतर त्यामधील ड्रायव्हर आणि प्रवासी तात्काळ बाहेर पडतात. मात्र, आता एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
अमेरिकेतील ब्रुकलिनमध्ये एक अपघात घडला. या अपघातानंतर कारने अचानक पेट घेतला. यानंतर कारचालक कारमधून बाहेर पडला आणि कारमध्ये असलेल्या आपल्या मैत्रिणिला सोडून तेथून निघून गेला.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कारमध्ये २३ वर्षीय अहमद सईद आणि २५ वर्षीय हरलीन ग्रेवाल प्रवास करत होते. अपघातानंतर अहमद सईद हा कारमधून बाहेर पडला आणि दुसऱ्या कारने रुग्णालयात उपचाराकरीता निघून गेला. मात्र, कारमध्ये त्याच्यासोबत असलेली भारतीय वंशाची हरलीन ग्रेवाल हीला बाहेर काढलेच नाही.
हरलीन ग्रेवाल कारमध्येच होती आणि कारने पेट घेतला. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आणि त्यांनी आग विजवली. मात्र, तोपर्यंत हरलीन हिचा दुर्दैवी अंत झाला होता.
दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये आरोपी अहमद सईद हा पेटत्या कारमधून बाहेर पडताना दिसत आहे. तसेच त्यानंतर तो टॅक्सी थांबवून त्यात बसून निघून जातानाही दिसत आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी अहमद सईद याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.
आरोपी अहमद सईद याने दावा केला आहे की, त्याने हरलीनला वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. तर, हरलीनच्या कुटुंबियांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.