Covid-19 : कठीण परिस्थितीतही अमेरिकेत राहण्याचा भारतीय विद्यार्थिनीचा निर्णय
अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या १,०९५,३०४ वर पोहोचली आहे.
श्वेता वाळंज, झी मीडिया, मुंबई : सध्या सर्वच देशांध्ये कोरोनाचं पाहायला मिळत आहे. पण इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. worldometersने प्रसिद्ध केलेल्या आकड्यानुसार आज अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या १,०९५,३०४ वर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत आपल्या एका भारतीय विद्यार्थिनीने अमेरिकेतच राहण्याच निर्णय घेतला आहे. तिचं नाव आश्लेशा वालचले असं आहे. ती अमेरिकेत बायोटेक विषयाचा आभ्यास करत आहे.
आश्लेशा अमेरिकेतील टेक्सास राज्यात राहत आहे. आश्लेशाच्या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. 'झी २४ तास'च्या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये तिने अमेरिकेतील सद्य स्थितीची माहिती दिली.
ती म्हणाली, 'सध्या परिस्थिती फार गंभीर आहे. त्यामुळे मी आहे त्या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला. शिवाय माझ्या या निर्णयाला आई-वडिलांनी पाठिंबा दिला. त्यांचा पाठिंबा असल्यामुळे मला हा निर्णय घेण्यासाठी फार मदत झाली.' असं मत तिने 'झी २४ तास'सोबत बोलताना व्यक्त केलं.
दरम्यान, अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या १,०९५,३०४ वर पोहोचली आहे. तर ६३ हजार ८७१ रुग्णांचा कोरोना या धोकादायक विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. ऐकीकडे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे तर दुसरीकडे रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर देखील पडत आहेत. १ लाख ५५ हजार ७३७ रुग्ण आतापर्यंत सुखरूप बरे झाले आहेत. शिवाय ८ लाख ७५ हजार ६९६ रुग्ण उपचार घेत आहेत.