पंजाब आणि हरियाणमधील काही तरुण रशियात अडकले असून त्यांनी सरकारकडे मदत मागितली आहे. आपली फसवणूक करत रशियाने युद्धात उतरवलं असल्याचा दावा या तरुणांनी केला आहे. आपल्याला जबरदस्तीने युक्रेनविरोधात युद्ध लढायला लावलं जात असल्याचं तरुणांचं म्हणणं आहे. तरुणांनी एक्सवर 105 सेकंदाचा व्हिडीओ शेअर करत सरकारकडे मदत मागितली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरुणांनी एक्सवर शेअर केलेल्या व्हिडीओत लष्कराचे कपडे घातल्याचं दिसत आहे. त्यांच्या अंगावर जॅकेट आणि डोक्यावर टोपी दिसत आहे. ते एका कोंडलेल्या आणि अस्वच्छ खोलीत उभे असून बंद खिडकी दिसत आहेत. यामध्ये सहा जण एका बाजूला उभे असून, हरियाणाच्या कर्नालचा 19 वर्षीय हर्ष परिस्थिती सांगत मदत मागत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, 27 डिसेंबरला तरुण रशियासाठी निघाले होते. नवीन वर्ष साजरं करण्यासाठी हे सर्वजण गेले होते. त्यांच्याकडे ऱशियाचा 90 दिवसांचा पर्यटक व्हिसा होता. यानंतर ते बेलारुसला जाणार होते. "एका एजंटने आम्हाला बेलारूसला नेण्याची ऑफर दिली. आम्हाला व्हिसाची गरज आहे याची कल्पना नव्हती. आम्ही बेलारूसला गेलो तेव्हा (व्हिसा नसताना) एजंटने आमच्याकडे जास्त पैसे मागितले आणि नंतर आम्हाला वाऱ्यावर सोडून दिलं. यानंतर पोलिसांनी आम्हाला पकडलं आणि रशियन प्रशासनाच्या ताब्यात दिलं. रशियन अधिकाऱ्यांनी आम्हाला कागदपत्रांवर स्वाक्षरी करायला लावली,” असा दावा हर्षने व्हिडीओत केला आहे. आता ते आम्हाला युक्रेनविरोधात युद्ध लढायला लावत आहेत असा दावा त्याने पुढे केला आहे. 



हर्षच्या कुटुंबाने सांगितलं आहे की, तो नोकरीच्या शोधातही गेला होता. जर तो रशियामार्गे गेल्यास त्याच्या पसंतीच्या देशात स्थलांतर करणं सोपं जाईल असं सांगण्यात आलं होतं. "माझा मुलगा 23 डिसेंबरला परदेशात गेला. तो कामाच्या शोधात गेला होता. पण रशियात त्याला पकडण्यात आलं आणि पासपोर्टही हिसकावून घेण्यात आला. आम्हाला त्याने सांगितलं आहे की, रशियन सैन्यांनी आम्हाला पकडलं असून 10 वर्षं जेलमध्ये पाठवण्याची धमकी देत लष्करात रुजू केलं आहे. आपल्याला जबरदस्ती लष्करी प्रशिक्षण दिलं जात असल्याचं त्याने सांगितलं आहे," अशी माहिती त्याच्या आईने दिली आहे. सरकारने माझ्या मुलाला सुरक्षितपणे घऱी आणावं अशी आर्त विनंती त्यांनी केली आहे. 


दरम्यान हर्षच्या भावाने दावा केला की त्याला शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यात आले आणि डोनेस्तक प्रदेशात तैनात करण्यात आलं आहे. तो आता जिवंत असेल की नाही हे सांगणंही कठीण आहे, असं त्यांनी सांगितलं असून सरकारकडे मदतीसाठी आवाहन केलं आहे. 


व्हिडीओतील दुसरी व्यक्ती गुरप्रीत सिंग असल्याची माहिती आहे. त्याच्या कुटुंबानेही मदतीसाठी याचना केली आहे. त्याचा भाऊ अमरित सिंगने सांगितलं आहे की, "त्यांनी बेलारूसमध्ये स्वाक्षरी केलेली कागदपत्रे रशियन भाषेत होती. यामुळे त्यांना सैन्यात सामील होण्यास भाग पाडलं गेलं. या कागदपत्रात एकतर 10 वर्षांचा तुरुंगवास स्वीकारतील किंवा रशियन सैन्यात सामील होतील असं लिहिण्यात आलं होतं," असा दावा करण्यात आला आहे.