कोरोनाविरुद्ध लढाई : जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताचं कौतुक
भारतात कोरोनामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : जगात कोरोनाच्या रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. सगळेच देश कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यातच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारताने सुरु केलेल्या आक्रमक कारवाईचं कौतुक केलं आहे. भारतात कोरोनाचे जवळपास ५०० रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ५४८ जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय़ घेण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारताने घेतलेल्या निर्णय़ांचं जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) चे कार्यकारी संचालक मायकेल माइकल रेयान यांनी म्हटलं की, 'भारत हा चीनसारखा अत्यंत दाट वस्तीचा देश आहे आणि या दाट लोकवस्ती असलेल्या देशांमध्ये काय होते त्यावर कोरोना विषाणूचे भविष्य निश्चित केले जाईल. सार्वजनिक आरोग्य पातळीवर भारताने आपली आक्रमक कारवाई चालू ठेवणे खरोखर खूप महत्वाचे आहे.'
मायकेल जे. रेयान यांनी पुढे म्हटलं की, 'साइलेंट किलर नावाच्या दोन गंभीर आजारांच्या निर्मूलनासाठी भारताने जगाचे नेतृत्व केले. भारताकडे प्रचंड क्षमता आहे, सर्व देशांमध्ये त्यांचे समुदाय आणि समाजाला एकत्रित करण्याची प्रचंड क्षमता आहे.'
संपूर्ण जगात सीजफायर: यूएन
दुसरीकडे, संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरे यांनी संपूर्ण जगाला कोरोनाची भीषणता पाहता जागतिक शांतता राखण्याचे आवाहन केले आहे ते म्हणाले, 'मी जगाच्या कानाकोपऱ्यात त्वरित जागतिक युद्धबंदीची मागणी करीत आहे.
१६ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू
संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. कोरोनाने आतापर्यंत जगभरातील १६००० हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. त्याचवेळी ३.६ लाखाहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे.
एकट्या इटलीमध्ये कोरोनामुळे ६.०७७ लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत ४०० हून अधिक लोकं मरण पावले आहेत. या मृत्यूची संख्या प्रत्येक देशात झपाट्याने वाढत आहे. जगातील १९० देश कोरोनामुळे त्रस्त आहेत. चीनमध्ये ३,२७० लोकांना मृत्यू झाला आहे.