इंडोनेशियाने भारताला सोपवले G20 चे अध्यक्षपद, PM मोदी झाले भावूक
पुढील एक वर्षासाठी G20 चे अध्यक्षपद भारताकडे सुपूर्द करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यावेळी भावूक झाले होते.
बाली : इंडोनेशियामध्ये यंदाचं G20 शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेला अनेक महत्त्वाच्या देशांचे प्रमुख उपस्थित आहे. आज बाली येथे सुरु असलेल्या शिखर परिषदेच्या समारोपात पुढील एक वर्षासाठी G20 चे अध्यक्षपद भारताकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे G20 चे अध्यक्षपद सोपवले. १ डिसेंबरपासून भारत औपचारिकपणे G-20 चे अध्यक्षपद स्वीकारणार आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, या गटाचे अध्यक्षपद भूषवणे ही अभिमानाची बाब आहे.
"सर्व देशांच्या प्रयत्नांनी, आम्ही G20 शिखर परिषदेला जागतिक कल्याणाचा एक प्रमुख स्त्रोत बनवू शकतो," असे मोदी म्हणाले, बाली येथे दोन दिवसीय शिखर परिषद आता संपले आहे. सदस्य देशांचे नेते संयुक्त घोषणेला अंतिम रूप देत आहेत.
G-20 मध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम, अमेरिका, आणि युरोपियन युनियन (EU) यांचा समावेश आहे. G20 ही जागतिक आर्थिक सहकार्याची प्रभावशाली संघटना आहे. हे जागतिक जीडीपीच्या सुमारे 85 टक्के, जागतिक व्यापाराच्या 75 टक्क्यांहून अधिक आणि जगाच्या लोकसंख्येच्या सुमारे दोन तृतीयांश जणांचे प्रतिनिधित्व करते.
पीएम मोदी म्हणाले की, 'आम्हाला जी-20 अजेंड्यात महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला प्राधान्य द्यायचे आहे. प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानाची बाब आहे कारण भारत G20 चे अध्यक्षपद भूषवत आहे. आम्ही भारतातील विविध राज्ये आणि शहरांमध्ये G20 बैठका आयोजित करू. आम्ही एकत्रितपणे G20 ला जागतिक बदलाचे उत्प्रेरक बनवू.'