...तर इस्रायल काही दिवसात संपेल; इराणच्या अयातुल्ला खोमेनींचा सूचक इशारा
Ayatollah Khamenei On Israel: 7 ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या इस्रायल आणि हमासच्या संघर्षामध्ये 9 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्यानंतरही संघर्ष कायम आहे.
इराणमधील सर्वोच्च नेते असलेल्या अयातुल्ला अली खोमेनी यांनी शुक्रवारी इस्रायल आणि पॅलेस्टाईन वादासंदर्भात सूचक विधान केलं आहे. शुक्रवारी हिब्रू भाषेत सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये इस्रायलसंदर्भात बोलताना, यहूदी लोकांचं राष्ट्र 'अमेरिकेने पाठिंबा काढला तर काही दिवसांमध्ये नष्ट होईल' असं अयातुल्ला अली खोमेनी यांनी म्हटलं आहे. एक्सवरुन (ट्वीटरवरुन) ही पोस्ट केली आहे.
खोमेनी नेमकं काय म्हणाले?
"जायोनी सरकार (इस्रायल) तुमच्याशी खोटं बोलत आहे. ही सरकार तेव्हाही खोटं बोलत होती जेव्हा त्यांनी आपल्या कैदेतील लोकांबद्दल चिंता व्यक्त केली होती," असं अयातुल्ला अली खोमेनी यांनी एक्सवरुन पोस्ट केलं आहे. या वाक्यामधील कैदी हा शब्द गाझामधील हमास या दहशतवादी संघटनेनं ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांसंदर्भात वापरला आहे. इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, सध्या गाझामधील हमासच्या दहशतवाद्यांनी 242 नागरिकांना ओलीस ठेवलं आहे. यामध्ये इस्रायली नागरिकांबरोबरच परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. अयातुल्ला अली खोमेनी यांनी आता इस्रायल 'असहाय आणि संभ्रमावस्थेत आहे' असं म्हटलं आहे. इराणच्या सर्वोच्च नेत्याने, "अमेरिकेच्या समर्थनाशिवाय (इस्रायल) काही दिवसांमध्ये कायमचा गप्प होईल," असं म्हटलं आहे.
बायडन यांचा इस्रायल दौरा
हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेसहीत फ्रान्ससारख्या मोठ्या देशांनी आम्ही इस्रायलच्या बाजूने उभं असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेने तर शस्रांच्या मदतीसहीत वाटेल ती मदत करण्याची तयारीही दर्शवली. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलला भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला होता. त्यांनी हमासच्या तावडीतून सुटलेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांना धीरही दिला होता.
संघर्ष सुरुच
लेबनान आणि इस्रायलच्या सीमेवर संघर्ष सुरु आहे. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर अचानक हमासच्या दहशतवादी गटाने हल्ला केला होता. यानंतर इस्रायलवर केलेल्या हल्ल्याच्या समर्थनार्थ हिजबुल्लाहने 8 ऑक्टोबर रोजी इस्रायलच्या लष्करी तळावर रॉकेट हल्ले केले होते. याला उत्तर देताना इस्रायलच्या लष्कराने लेबनानच्या ईशान्येकडील सीमा भागामध्ये जोरदार हल्ला केला होता.
तणाव वाढला
लेबनानच्या उत्तरेकडील सीमेवर शुक्रवारी सायंकाळी हिजबुल्लाचा नेता हसन नसरल्लाच्या भाषणामुळे तणाव वाढला आहे. या भाषणानंतर पुन्हा संघर्ष उफाळून येण्याची दाट शक्यता आहे. मागील महिन्यामध्ये इस्रायलवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर पहिल्यांदाच नसरल्ला सार्वजनिकरित्या भाष्य करत समोर आला.
एकमेकांवर हल्ले
हमासला सहकार्य करणाऱ्या हिजबुल्लाने उत्तरेकडील सीमेजवळ इस्रायलच्या तुकड्यांवर ड्रोन, हातगोळे आणि आत्मघाती ड्रोन्सने हल्ले केले. इस्रायली लष्कराने फायटर जेट्स आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हल्ल्याला उत्तर दिल्याचं म्हटलं आहे.