Iranian Couple 10 Year Jail: प्रेमीयुगुलाला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा! गुन्हा काय तर `रस्त्यावर नाचले`
Iranian Couple Sentenced For More Than 10 Years Over Viral Dance: हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असून त्यांना लाखोंच्या संख्येने फॉलोअर्स आहेत. या दोघांचा हा व्हिडीओ त्यांनीच सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
Iranian Couple Sentenced For More Than 10 Years Over Viral Dance: इराणमधून (Iran) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे रस्त्यावर डान्स करणाऱ्या एका जोडप्याला (Dance Video) अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर या जोडप्याला रस्त्यावर डान्स केल्याच्या आरोपाखाली तब्बल 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इराणची राजधानी असलेल्या तेहरानमधील (Tehran Viral Video) फ्रीडम स्वेअर येथे स्ट्रीट डान्स करणाऱ्या या जोडप्याने आपला डान्स करतानाचा व्हिडीओ स्वत: सोशल मीडियावर शेअर केला होता. यानंतर इराणमधील कट्टर इस्लामिक सरकारने या दोघांना ताब्यात घेतलं. दोघांनी कायद्याचं उल्लंघन केल्याचं सांगत त्यांना अटक करण्यात आल्याचं सांगितलं गेलं.
या तिन्ही गुन्ह्यांखाली ठरवण्यात आलं दोषी
सोशल मीडियावर या दोघांचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अस्तियाज हघीघी (Astiyazh Haghighi) नावाची तरुणी तिचा 22 वर्षीय प्रेयकर अमीर मोहम्मद अमीरीबरोबर (Amir mohammad Ahmadi) स्ट्रीट डान्स (Street Dance) करत होती. अस्तियाज हघीघीने इराणमधील कठोर नियम असतानाही हिजाब (Hijab) परिधान केला नव्हता. इराणमध्ये सार्वजनिक स्थळी महिलांना डान्स करण्याची परवानगी नाही. इराणमधील कोर्टाने अस्तियाजला सार्वजनिक ठिकाणी डान्स करणे, वेश्या व्यवसायाला समर्थन करणं आणि राष्ट्रीय सुरक्षेमध्ये अडथळा निर्माण करण्याच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवलं आहे. यानंतर या दोघांना 10 वर्ष 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दोघेही सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय
न्यूज एजन्सी 'सीएनएन'ने दिलेल्या वृ्त्तानुसार सुरक्षा दलांनी सर्वात आधी 30 ऑक्टोबर रोजी छापेमारी करुन दोघांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं. हे जोडपं इन्स्टाग्रामवर फार लोकप्रिय आहे. दोघांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक मिलियन फॉलोअर्स आहेत. दोघांचे दोन युट्यूब चॅनेलही आहेत. या युट्यूब चॅनेल्सवर लाखो सबस्क्राइबर्स आहेत.
कठोर कायदे
इराणमध्ये फार कठोर कायदे आहेत. महिलांसाठी तर हे कायदे फारच कठोर असून त्यांच्यावर अनेक कायदेशीर निर्बंध लादले जातात. येथील कोणत्याही महिलेले सार्वजनिक ठिकाणी डान्स करण्याची परवानगी नाही. असं असताना अस्तियाजने तिच्या प्रियकराबरोबर डान्स केल्याने तिला दोषी ठरवण्यात आलं. येथील सरकारने सोशल मीडियावर कंटेट पोस्ट करण्यावरही बंदी घातल्याचं समजतं.