आयसिसची शेवटची लढाई : इराकी फौजांसमोर कठीण आव्हान
इराकच्या पश्चिमेकडच्या वाळवंटातल्या आयसिसच्या अड्ड्यांवर ताबा मिळवतांना आम्हाला कडव्या झुंजीचा सामना करावा लागतोय, असं वक्तव्य इराकी फौजेच्या जनरल याह्या रसूल यांनी केलयं.
बगदाद : इराकच्या पश्चिमेकडच्या वाळवंटातल्या आयसिसच्या अड्ड्यांवर ताबा मिळवतांना आम्हाला कडव्या झुंजीचा सामना करावा लागतोय, असं वक्तव्य इराकी फौजेच्या जनरल याह्या रसूल यांनी केलयं.
इराकी फौजेला यश
आयसिसच्या ताब्यातील बहुतांश भाग ताब्यात घेण्यात इराकी फौजेला यश आलयं. इराकच्या पश्चिमेकडे सीरीयाच्या सीमेला लागून असलेल्या वाळवंटी प्रदेशात शेवटची लढाई सुरू आहे.
वादी हुरान खोरं
इराकी फौजेने 29,000 चौ. कि.मी.च्या वाळवंटी प्रदेशापैकी 50 टक्के प्रदेश ताब्यात घेतला असून, लढाईचा पहिला टप्पा संपला आहे. आता वादी हुरान खोरं ताब्यात घेण्यात लढाईला सुरूवात होईल. वादी हुरान खोरं हे 650 फूट खोल आणि 350 कि.मी. लांब आहे. ते सौदी अरेबियापासून जॉर्डनपर्यंत पसरलेलं आहे. त्यामुळं त्याचं व्यूहरचनात्मक महत्व प्रचंड आहे.
आयसिसचा बालेकिल्ला
2014 पासून आयसिसचा वादी हुरान खोऱ्यावर ताबा आहे. आयसिसचे तिथे मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठे आणि तळ आहेत.
इराकी फौजेने या परिसरात चढाईला सुरूवात करून आयसिसच्या अंतिम पाडावासाठी पावलं उचलली आहेत.