नवी दिल्ली: पाकिस्तान या ना त्या कारणानं नेहमीच चर्चेत असतो. यावेळी पाकिस्तानवर आणखी एक मोठं संकट कोसळलं आहे. हे संकट आहे अनुवांशिक आजारांचं आणि हे संकट पाकिस्तानी मुसलमान नागरिकांनी स्वतःहून ओढवून घेतलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानात आपल्याच चुलत, मावस, मामे आणि आते भावा-बहिणींशी लग्न करण्याची परंपरा आहे. ही धार्मिक परंपराच पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा ठरली आहे. कारण जवळच्या नातेवाईकांमध्येच लग्न करण्याच्या या रुढीमुळं पाकिस्तानी मुसलमानांच्या मुलांमध्ये अनुवांशिक आजारांचं प्रमाण वाढलं आहे.


पाकिस्तानात रक्ताच्या भावाबहिणींमध्ये निकाह होत असल्यानं अनुवांशिक आजार वाढलेत, असं जेनेटिक म्युटेशन अहवालात म्हटलं आहे. जवळच्या नातेवाईकांच्या विवाहातून जन्माला आलेल्या सुमारे 11 हजार मुलांची पाहणी करण्यात आली. त्यापैकी 386 मुलांमध्ये विविध प्रकारचे अनुवांशिक आजार आढळले.


अशा मुलांना 130 हून अधिक अनुवांशिक आजारांचा धोका संभवतो. मेंदू विकार, हृदयविकार, आंधळेपणा, बहिरेपणा, थॅलेसेमिया असे अनेक आजार मुलांना होतात, असं अहवालात म्हटलं आहे. केवळ पाकिस्तानी मुसलमानच नव्हे तर जगभरातील अनेक मुस्लिम समुदायांमध्ये जवळच्या नातेवाईकांशी लग्न केलं जातं. 


जेरूसलेममधल्या अरबांमध्येही तीच परंपरा आहे. एवढंच कशाला भारतात पारशी समुदायात आणि दक्षिण भारतातील काही जाती-जमातींमध्येही जवळच्या नातेवाईकांशी लग्न करण्याची रुढी चालत आली आहे. मात्र असं लग्न मुलांच्या आयुष्यात विघ्न ठरू शकतं. त्यामुळं ही प्रथा मोडीत काढण्याची गरज आहे.