नवी दिल्ली: इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरिया (आयसिस) या दहशतवादी संघटनेने श्रीलंकेत झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारली आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आयसिसने आपल्या अमाक न्यूज वृत्तसंस्थेच्या माध्यमातून ही माहिती प्रसारित केली. सुरुवातीला या हल्ल्यामागे श्रीलंकेतील नॅशनल ताहिद जमात या संघटनेचा सहभाग असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. तर काही वेळापूर्वीच श्रीलंकेच्या उपसंरक्षणमंत्र्यांनी ख्राईस्टचर्च हल्ल्याचा बदला म्हणून श्रीलंकेत बॉम्बस्फोट करण्यात आल्याचा दावा संसदेत केला होता. प्राथमिक चौकशीतून ही माहिती समोर आली होती. मात्र, त्यानंतर काही वेळातच आयसिसने पुढे येत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. अनेक तज्ज्ञ या हल्ल्यांमागे आयसिस, अल कायदा, लष्कर ए तोयबा आणि काही प्रमाणात अफगाण तालिबान या संघटनांचा हात असल्याचे सांगत होते. कारण, आजघडीला इतके सुनियोजित बॉम्बस्फोट करण्याची क्षमता अन्य संघटनांकडे नाही. अखेर आयसिसचा या हल्ल्यामागील सहभाग समोर आला आहे. 




एकूण सात आत्मघाती हल्लेखोर यात सामील होते. रविवारी चर्च व पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आलेल्या स्फोटात आतापर्यंत ३२१ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल ५०० जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी २४ संशयित व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण अल्पसंख्य मुस्लिम समाजाचे आहेत. या २४ पैकी नऊ जणांना न्यायालयाने कोठडी दिली आहे.