मुंबईतील Flat च्या किंमतीत मिळतंय बेट; ऑफर पाहून तुम्हालाही नक्कीच वाटेल आश्चर्य
Island At Cost of Mumbai Flat: मुंबईसारख्या महागड्या शहरांमध्ये सध्या ज्या दरामध्ये फ्लॅट उपलब्ध आहे त्या दरात एखादं बेट विकत मिळतंय असं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल ना?
Island At Cost of Mumbai Flat: मुंबईमधील फ्लॅटच्या (Mumbai Flats) किंमतीत तुम्हाला एखादं छोटं बेटच विकत घेण्याची ऑफर मिळाली तर? नक्कीच तुम्हाला हा प्रश्न वाचून काय मस्करी करताय राव असं वाटत असेल. मात्र ही मस्करी नसून खरोखरच मुंबईमधील एका फ्लॅटच्या किंमतीत चक्क एक बेट विकायला काढलं आहे. मुंबईसारख्या महागड्या शहरामधील एका फ्लॅटच्या किंमतीएवढ्या रक्कमेमध्ये अमेरिकेतील निकारागुआ या देशाजवळ असलेल्या कॅरेबियन बेटांच्या (Caribbean Sea) साखळीतील एक बेट विकायला काढण्यात आलं आहे. या बेटाचं नावं इगुआना (Iguana Island) असं आहे. या बेटाच्या मालकाने हे बेट विकायला काढलं असून मुंबईतील एका फ्लॅटच्या किंमतीत हे बेट उपलब्ध असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
बेट नेमकं कुठे आहे?
इगुआना बेट पाच एकरांमध्ये वसलेलं आहे. हे बेट म्हणजे नैसर्गिक सौंदर्याचा उत्तम नमुना आहे. या बेटावर फार मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. येथूनच जवळ एक ज्वालामुखी असलेलं बेटही आहे. निकारागुआ देशातील ब्लूफील्ड या समुद्रकिनाऱ्यापासून हे बेट 19.5 किलोमीटर अंतरावर आहे. हिरव्या आणि निळ्या कॅरेबियन समुद्रामधील हे बेट फारच सुंदर आहे. इगुआना बेट एका व्यक्तीची खासगी संपत्ती आहे. या मालकाने चांगली रक्कम मिळाल्यास आपण हे बेट विकण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. या बेटावर वास्तव्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींबरोबरच इतरही बऱ्याच सोयी उपलब्ध आहे. वीजपुरवठा, पाणी, स्वच्छ पाण्याचा पुरवठा यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. निसर्गाची आवड असलेल्या आणि साहसी खेळांबद्दल प्रेम असलेल्यांसाठी (Adventure lovers) हे बेट उत्तम जागा आहे.
बेटावरील घर कसं?
रियल इस्टेटसंदर्भातील प्रायव्हेट आईसलॅण्ड्स ऑनलाइन या वेबसाईटवर हे बेट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं सांगितलं आहे. या बेटावर तीन बेडरुम, दोन बाथरुम असलेलं एक घरही आहे. यात एक सोफा, डाइनिंग रुम, बार, लिव्हिंग रुमचा समावेश आहे. तसेच येथे नोकरांच्या राहण्याची सोयही उपलब्ध आहे. नोकरांच्या राहण्याची सोय ही बेटाच्या दुसऱ्या बाजूला आहे. अमेरिकेतील एका बिल्डरने आधुनिक डिझाइननुसार हे घर बनवल्याचं सांगण्यात आलं आहे.
मॅनेजर आणि नोकर
या बेटावर स्थलांतरित फुलपाखरं दरवर्षी येतात. या बेटावर एक 28 फुटांचा टॉवरही आहे. या टॉवरवरुन बेटाच्या आजूबाजूचा प्रदेश पाहता येतो. या बेटाच्या आझूबाजूला स्नॅपर माकेरेल, बाराकूड, ट्युना, बिलफिश, वाहू यासारख्या प्रजातीचे मासे आढळतात. या बेटाच्या आजूबाजूचा समुद्रतळ तुलनेनं फारच उथळ आहे. या ठिकाणी मोठ्याप्रमाणात प्रवळांचं अस्तित्व आहे. त्यामुळेच साहसी खेळ, स्कुबा डायव्हिंगची आवड असणाऱ्यांसाठी हे बेट उत्तम ठिकाण आहे. या बेटाची काळजी घेण्यासाठी एक ऑनसाइट मॅनेजर म्हणजेच बेटावर राहून संपत्तीची देखभाल करणारा व्यवस्थापक आणि केअरटेर्सही उपलब्ध आहेत.
किंमत किती?
या बेटाची किंमत भारतीय चलनानुसार सध्या 3 कोटी 86 लाख रुपये इतकी आहे. मुंबईमधील अनेक आलिशान इमारतींमध्ये मोठ्या आकाराच्या घरांच्या किंमती सामान्यपणे चार कोटींहून अधिक असतात. त्यामुळेच या घरांच्या किंमतीत पूर्ण बेट खरेदी करण्याची संधी या ऑफरच्या माध्यमातून उपलब्ध आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.