Israel Hamas War : गाझा पट्टीतील (gaza strip) हमास (Hamas) या दहशतवादी गटाने शनिवारी पहाटे इस्रायलवर (israel vs hamas) केलेल्या रॉकेट हल्ल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. हमासने पाच हजार रॉकेट डागल्याचा दावा इस्रायलने केला आहे. या हल्ल्यानंतर हमासचे दहशतवादी थेट इस्रालयमध्ये घुसले असून लोकांचे अपहरण करत आहेत. अशातच हमासच्या दहशतवाद्यांनी क्रौर्याची परिसीमा ओलांडली आहे. घुसखोरी केल्यानंतर दहशतवाद्यांनी सर्वसामान्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. यामध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. अशाच एका महिलेच्या व्हिडीओबाबतची सत्यता समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हमासचे दहशतवादी खुलेआम गोळीबार करण्याबरोबरच महिलांचे अपहरणही करत आहेत. या दहशतवाद्यांनी एका परदेशी महिलेला ओलीस ठेवले होते. यानंतर तिला विवस्त्र करून वाहनावर बसवण्यात आले. दहशतवाद्यांनी तशाच अवस्थेत धिंड देखील काढली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये पॅलेस्टिनी 'अल्ला हू अकबर'च्या घोषणा देत होते. तसेच व्हिडीओमध्ये दहशतवादी महिलेवर थुंकत होते. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.


व्हायरल व्हिडीओमध्ये दहशतवाद्यांनी तरुणीवर अत्याचार केल्याचे दिसत आहे. यापूर्वी ही महिला इस्रायली लष्कराची शिपाई असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता त्याची ओळख समोर आली आहे. खरं तर ही महिला जर्मन नागरिक असून ती इस्रायलमध्ये एका पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी आली होती. त्यानंतर हमासने हल्ला केल्यानंतर तिचे अपहरण केले.



शॅनी लौक असे या महिलेचे नाव आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शॅनीच्या आईने तिची ओळख पटवली असून हमासच्या दहशतवाद्यांना किमान मुलीचा मृतदेह परत करण्याचे आवाहन केले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये शॅनीच्या पायावर दिसणाऱ्या टॅटूवरुन तिची ओळख पटवली आहे. शनिवारी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला करुन समुद्रमार्गे इस्रायलमध्ये प्रवेश केला आणि नरसंहाराला सुरुवात केली. दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसून लोकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली होती.


इस्रायलवरील हल्लाचा लंडनमध्ये जल्लोष


पॅलेस्टाईनच्या हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी केलेल्या हल्ल्यानंतर ब्रिटन आणि भारतासह अनेक देशांनी इस्रायलशी मैत्री कायम ठेवण्याची भाषा केली आहे. मात्र आता इराणसोबत लंडनमध्येही या हल्ल्याचा आनंद व्यक्त केला जात आहे. लंडनमधील लोक इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्याचा आनंद साजरा करत आहेत.  या घटनेनंतर पोलिसांनी लंडनमध्ये गस्त वाढवली आहे.