Israel-Hamas Conflict : इस्त्रायल आणि हमासदरम्यान सुरु असलेलं युद्ध थांबण्याची चिन्ह दिसत नाहीएत. गेल्या 12 दिवसांपासून सुरु असलेल्या या युद्धात अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेलेत. दोन्ही देशातील अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्यात. या युद्धातील मन हेलावून टाकणाऱ्या अनेक घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला असून हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळतायत. हमासने इस्त्रायलवर हवाई हल्ले (Israel-Hamas War) केल्यानंतर प्रतिउत्तर म्हणून इस्त्रायलनेही हल्ला सुरु केलाय. यात पॅलेस्टाईनमधले (Palestin) नागरिक मारले गेलेत, तर अनेक जण जखमी झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना रुग्णालयात दाखल केलं जात आहे. इथले डॉक्टर दिवस-रात्र जखमींवर उपचार करण्यात गुंतलेत. एका रुग्णालयात एक डॉक्टर हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांवर उपचार करत असताना त्यांच्यासमोर अचानक त्यांच्या स्वत:च्याच मुलाचा मृतदेह येतो. रुग्णालयातील ते दृष्य प्रत्येकाला स्तब्ध करायला लावणारं होतं. इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात या डॉक्टरच्या मुलाचा मृत्यू झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियवर व्हायरल झाला आहे. 


डॉक्टरच कुटुंब गाझा पट्टीत राहातं. गाझा पट्टीत इस्त्रायलकडून सातत्याने हल्ले केले जात आहेत. गाझा पट्टीतील हमासची ठिकाणं इस्त्रायल सेनेच्या निशाण्यावर आहेत. याच हल्लात डॉक्टरचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. कुटुंबातील अनेक जण जखमी झालेत. तर त्यांच्या लहान मुलाचा मृत्यू झाला. व्हायरल व्हिडिओत डॉक्टर एकेका जखमींची विचारपूस करत पुढे जात असताना एक स्ट्रेचरवर त्याला स्वत:च्या मुलाचा मृतदेह दिसतो. आपल्या लाडका लेक असा निपचीत पडलेला पाहून त्या डॉक्टरच्या अश्रूंचा बांध फुटतो. डॉक्टरची पत्नीही तिथे उपस्थित असून तिनेही हंबरडा फोडलेला दिसतोय. तर दुसरा मुलगा जोरजोरात रडताना दिसतोय. 


युद्धाचे परिणाम किती भयानक असतात हे या व्हिडिओवरुन दिसतंय. इस्त्रायल-हमास युद्धात अशा अनेक घटना समोर येताना दिसतायत. दोन देशांच्या युद्धात निष्पाप नागरिकांचा हकनाक बळी जातोय. 



गाझातील रुग्णालयावर हल्ला
मंगळवारी रात्री उशिरा इस्रायली सैन्याने गाझा पट्टीतील एका रुग्णालयावर हल्ला केला, ज्यामध्ये आतापर्यंत 500 लोकांचा मृत्यू झाला. दक्षिण गाझामधील खान युनिस आणि रफाह इथं इस्त्रायलने हवाई हल्ला केल्याचा दावा हमासने केलाय. इस्रायलने हा आरोप फेटाळून लावत हमासने डागलेल्या क्षेपणास्त्रामुळे ही घटना घडल्याचं म्हटलं आहे. हल्ल्याच्या वेळी शेकडो लोक अल-अहली रुग्णालयात होते. 'द असोसिएटेड प्रेस'ने पाठवलेल्या फोटोंमध्ये हॉस्पिटलच्या हॉलमध्ये आग, तुटलेल्या काचा आणि मृतदेह दिसत होते. हल्ल्याची माहिती कळवल्यानंतर जगभरातून निषेध नोंदवला जात आहे.