मोत्जा, इस्रायल : कोरोनाच्या आपत्तीत कामाच्या संधी निर्माण करण्यासाठी, एक इस्रायली कंपनी सोन्याचं, हिरेजडित मास्क बनवत आहे. इस्रायलच्या एका ज्वेलरी कंपनीने असा दावा केला आहे की, कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी ते जगातील सर्वात महागडं मास्क तयार करत आहेत. या मास्कची किंमत 15 लाख डॉलर्स असल्याची माहिती मिळत आहे. सोन्याच्या या मास्कला हिरेही लावण्यात येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मास्कचे डिझायनर इस्साक लेवी यांनी सांगितलं की, 18 कॅरेट सोन्यापासून बनलेल्या या मास्कमध्ये 3600 काळे आणि पांढरे हिरे लावण्यात येणार आहेत. तसंच एन99 फिल्टरही लावण्यात येणार आहे. एका खरेदीदाराच्या मागणीवरुन हे मास्क बनवण्यात येत आहे.


खरेदीदाराच्या मास्कबाबत आणखी दोन मागण्या होत्या. हे मास्क या वर्षाच्या शेवटपर्यंत बनून तयार असावं आणि हे जगातील सर्वात महागडं मास्क असावं, अशा खरेदीदाराच्या मागण्या असल्याचं, 'यवेल कंपनी'चे मालक लेवी यांनी सांगितलं. लेवी यांनी खरेदीदाराची ओळख सांगण्यास नकार दिला. मात्र त्यांनी हे महागडं मास्क तयार करुन घेणारा व्यक्ती अमेरिकेत राहणारा एक चीनी उद्योगपती असल्याचं त्यांनी सांगितलं.


'या मास्कमुळे सध्याच्या अतिशय आहानात्मक परिस्थितीत माझ्या कर्मचाऱ्यांना काम मिळालं असल्याने मी खूश आहे', अशी भावना लेवी यांनी व्यक्त केली आहे.