गाझाविरोधात आम्ही पुकारलेलं युद्ध हे स्थानिक नाही. हे जागतिक युद्ध आहे. या युद्धात त्यांचा पराभव करणं महत्त्वाचं असून विजय हा एकमेक पर्याय आहे. आम्ही हमासचा पराभव करु, त्यांना संपवून टाकू असं इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहू म्हणाले आहेत. दरम्यान गाझाविरोधातील युद्ध संपल्यानंतही आपलं सैन्य तिथे तैनात असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. युद्धानंतर आम्हीच गाझामधील सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी घेऊ. आमचं सैन्य अनिश्चित काळासाठी गाझा पट्टीवर असेल असं ते म्हणाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ABC News शी बोलताना नेतान्याहू यांनी सांगितलं की, "मला वाटतं इस्रायल अनिश्चित काळासाठी गाझामधील सुरक्षेची जबाबदारी घेणार आहे. याचं कारण जेव्हा ती नसते तेव्हा काय होतं हे आपण पाहिलं आहे. जेव्हा आम्ही सुरक्षेची जबाबदारी घे नाही तेव्हा हमासच्या दहशतवादाचा सामना करावा लागतो. तसंच ते ज्या पातळीवर जातं त्याचा आम्ही विचारही केलेला नसतो". इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी युद्ध संपल्यानंतर गाझा ताब्यात घेण्याची कोणतीही योजना नाही असा दावा केल्यानंतर त्यांनी हे विधान केलं आहे. 


इस्रायल सतत गाझा पट्टीवरील हमासच्या ठिकाणांवर जमीन आणि हवेतून हल्ले करत आहे. यादरम्यान नेतान्याहू यांनी ही लढाई सभ्यता आणि रानटीपणा यांच्यात आहे. जर मध्य पूर्व दहशतवादासमोर झुकला तर पुढील क्रमांक युरोपचा असेल आणि कोणीही सुरक्षेत नसेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. 


हमासने 7 ऑक्टोबरला जगातील बलाढ्य देशांच्या यादीत असणाऱ्या इस्रायलवर भीषण हल्ला केला होता. या हल्ल्यात 1400 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर बेंजमिन नेतान्याहू यांनी जोपर्यंत हमासचा खात्मा करत नाही तोपर्यंत हल्ले थांबवणार नाही असं सांगत आहेत. नेतन्याहू म्हणाले की, दहशतवादाची धुरा इराणच्या नेतृत्वाखाली आहे. यामध्ये हिजबुल्लाह, हमास, हुथी आणि त्यांचे इतर वंशज यांचा समावेश आहे.


युद्धात 10,000 पॅलेस्टिनी नागरिक ठार


इस्रायलने हमासच्या ठिकाणावर हल्ले सुरूच ठेवले आहेत. इस्रायली सैन्य हवाई हल्ले आणि जमिनीवरील कारवाईच्या माध्यमातून हमासची ठिकाणं उद्ध्वस्त करत आहे. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 10,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. काल इस्रायलने हमासची 450 ठिकाणं उद्ध्वस्त केली. एवढेच नाही तर इस्रायलने गाझा शहरातील हमासचे मिलिटरी कॉम्प्लेक्सही ताब्यात घेतले.


हमासचा कमांडर ठार


इस्रायली सैन्याने हमासच्या देर अल-बालाह बटालियनचा कमांडर वेल असेफा याला ठार केले. आसेफाने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायली नागरिकांवर हल्ला करण्यासाठी हजारो दहशतवाद्यांना पाठवण्यास मदत केली. याशिवाय गुप्तचरांच्या आधारे आयडीएफच्या विमानांनी हवाई हल्ला करून जमाल मुसाला ठार केले. जमाल हा हमासच्या विशेष सुरक्षा अभियानांचा प्रमुख होता.