इस्लामाबाद - जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर याने बालाकोटमध्ये हवाई हल्ले झाल्याचे मान्य केले आहे. पण त्यामुळे आपल्या संघटनेचे फारसे नुकसान झालेले नाही. त्याचबरोबर आपल्या संघटनेच्या सदस्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांनाही कसलाही धक्का बसलेला नाही, असा दावा मसूद अजहर याने केला आहे. पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे नियंत्रण रेषा ओलांडून सुमारे ८० किलोमीटर आत घुसून बालाकोट, मुझफ्फराबादमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यात सुमारे ३५० दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात मौलाना अम्मार, मौलाना तल्हा सैफ, मुफ्ती अजहर खान काश्मिरी आणि इब्राहिम अजहर यांना लक्ष्य करण्यात आले. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेला भारताच्या हवाई हल्ल्यांमुळे जोरदार धक्का बसला आहे. या संघटनेचे पंचतारांकित प्रशिक्षण तळ बालाकोटमध्येच होते. ते हवाई हल्ल्यात उदध्वस्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात शस्त्रसामुग्रीही नष्ट करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर मौलान मसूद अजहरलाही धक्का बसला आहे. मौलाना तल्हा सैफ हा मसूद अजहरचा भाऊ आहे. जैश ए मोहम्मदच्या कोणत्याही दहशतवादी कारवाईची तयारी करण्याची जबाबदारी सैफकडेच असायची. त्याचबरोबर मौलाना अम्मार याने आतापर्यंत अनेकवेळा काश्मीर आणि अफगाणिस्तानमध्ये हल्ले घडवून आणले आहेत.


१९९९ मध्ये आयसी ८१४ या विमानाच्या अपहरणात इब्राहिम अजहर याचा मोठा सहभाग असायचा. तो मौलाना मसूद अजहरचा मोठा भाऊ आहे. काश्मीरमध्ये कोणत्याही दहशतवादी कारवाया करण्यात इब्राहिम अजहरचा कायम सहभाग असायचा. या दहशतवाद्यांचा वावर असल्यामुळेच बालाकोटमध्ये हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पण या हल्ल्यात दहशतवाद्याचे किती म्होरके मारले गेले, याला अद्याप पुष्टी मिळालेली नाही. 


भारताच्या मिराज जातीच्या १२ विमानांनी मंगळवारी पहाटे बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चामोटीमध्ये नियंत्रित स्वरुपात हल्ले घडवून आणले. केवळ दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठीच हे हल्ले घडवून आणण्यात आले होते. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानमधील सामान्य नागरिकांना कोणताही धोका पोहोचलेला नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.