मुंबई : भारतीयांची मान अभिमानानं उंचावणारी अशी ही बातमी आहे. जगात भले सर्वात मोठे अब्जाधीश युरोप-अमेरिकेत असतील... पण दातृत्वामध्ये मात्र एका भारतीयानं या सर्वांनाच मागे टाकलंय. त्यांचं नाव आहे जमशेदजी टाटा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय उद्योगाचे पितामह जमशेदजी टाटा हे जगातले आजवरचे सर्वात मोठे दानशूर ठरले आहेत. स्वतः जमशेदजी आणि त्यांनी स्थापन केलेल्या टाटा समूहानं आतापर्यंत तब्बल 102 अब्ज अमेरिकन डॉलर्सचं दान केलंय. हुरून रिपोर्ट आणि एडलगिव्ह फाऊंडेशननं जगातल्या 50 सर्वात मोठ्या दानशुरांची यादी तयार केलीये... 


या यादीमध्ये जमशेदजी अव्वल स्थानी आहेत. दुस-या क्रमांकावर आहे बिल आणि मिलिंडा गेट्स हे घटस्फोटित जोडपं. त्यांनी आतापर्यंत 74.6 अब्ज डॉलर्स दान केले आहेत.  तिस-या नंबरवर 37. 4 अब्ज डॉलर्स दान देणारे वॉरन बफे आहेत. जॉर्ज सॉरस चौथ्या तर जॉन डी रॉकफेलर पाचव्या स्थानावर आहेत. 


जमशेदजींनी आपली दोन तृतियांश संपत्ती सामाजिक कार्यासाठी खर्च केली. देशभरात अशी शेकडो उदाहरणं आपल्याला सापडतील. 


बंगळुरूचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस हे त्यांनी उभारलेलं सर्वात मोठं ज्ञानमंदिर... 
प्लेगच्या साथीत मुंबईमध्ये हाफकिन इन्स्टिट्यूटसारख्या संस्थेची स्थापना जमशेदजींनी केली. 
पुढे टाटा समूहानं मुंबईतच उभारलेल्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलचा लौकीक तर जगजाहीर आहे. 
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यादेखील जगभरात प्रसिद्ध असलेल्या संस्था... 


अझीम प्रेमजीही 50 दानशुरांच्या यादीत


जगभरातील दानशुरांच्या यादीत दुसरे भारतीय आहेत अझिम प्रेमजी.. त्यांनी आपली तब्बल 22 अब्ज डॉलर्सची संपत्ती कोणताही विचार न करता समाजकार्यासाठी दान केलीय. या दोन भारतीयांव्यतिरिक्त दानशुरांच्या यादीत 39 अमेरिकन, 5 ब्रिटिश, 3 चिनी व्यक्तींचा समावेश आहे. या 50 जणांनी मिळून गेल्या शंभर वर्षात 832 अब्ज डॉलर्स दान केले आहेत. यात 503 अब्ज संस्थात्मक आणि 329 वैयक्तिक दान आहे. 


मात्र या सर्व दानशुरांमध्ये सर्वात मोठे ठरतात ते जमशेदजी आणि त्यांनी स्थापन केलेला टाटा समूहच... देश पारतंत्र्यात असताना, अत्यंत प्रतिकूल स्थितीत संपत्ती निर्माण करणं आणि दान करणं हे दोन्ही टाटांनी करून दाखवलं.