डोकलामवरून भारत - चीन वादात जपानचा भारताला पाठिंबा
बळाचा वापर करून जैसे थे परिस्थिती बदलणं चुकीचं असून डोकलामविषयी भारताची भूमिका योग्यच असल्याचं जपाननं म्हटलंय.
नवी दिल्ली : बळाचा वापर करून जैसे थे परिस्थिती बदलणं चुकीचं असून डोकलामविषयी भारताची भूमिका योग्यच असल्याचं जपाननं म्हटलंय.
डोकलामवरून भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात जपाननं भारताची बाजू उचलून धरलीय. गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये डोकलामच्या सीमेवरून तणावाचं वातवरण आहे. चीनकडून वारंवार युद्धाची धमकी देण्यात येतेय. पण भारतानं पहिल्यापासूनच चर्चेनं तोडगा काढण्याचा प्रयत्न केलाय.
भारताची चर्चेचीच भूमिका योग्य असल्याचं जपाननं म्हटलंय. कालच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यालयानंही चीन आणि भारतानं समोरासमोर बसून वादावर तोडगा काढावा असं म्हटलं होतं. त्यापार्श्वभूमीवर जपाननंही भारताला दिलेला पाठिंबा महत्वाचा मानला जातोय.
शिंजो आबे लवकरच भारत दौऱ्यावर
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे सप्टेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहेत. जपानचे पंतप्रधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एक लाख कोटींच्या महत्वाकांक्षी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रॉजेक्टची सुरुवात करण्यासाठी अहमदाबादला जाऊ शकतात.
दोन्ही नेते जपान इंडस्ट्रियल पार्क्सच्या लॉन्चिंगमध्ये देखील सहभागी होणार आहे. याशिवाय साबरमती रिव्हरफ्रंटवर आयोजित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फेस्टिवलच्या उद्घाटन सोहळ्यातही ते सहभागी होणार आहेत.
शिंजो अबे यांच्या भारत दौऱ्यात गुजरात सरकार आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फेस्टिवलचे यजमान असणार आहेत. याच्या माध्यमातून ते गुजरात, भारत आणि जगातील बुद्धांशी जोडलेला वारसा याचं दर्शन घडवणार आहेत.