कर्मचाऱ्यानं तीन मिनिटे अगोदरच लंचसाठी डेस्क सोडला म्हणून बॉसनं...
दोषी अधिकाऱ्यानं लंचपूर्वी तीन मिनिट बाकी असतानाच १२.५७ ला आपला डेस्क सोडला
टोकियो : वक्तशीरपणा शिकावा तो जपानकडून... जपानमध्ये एका-एका मिनिटाचाच नाही तर सेकंदाचाही हिशोब ठेवला जातो... इथलीच एक घटना समोर येतेय ज्यामुळे संपूर्ण सरकारी विभागाला टीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण देशाची माफी मागावी लागलीय. जपानच्या जलविभागात काम करणाऱ्या एक अधिकाऱ्यानं बुधवारी २० जून रोजी लंचला तीन मिनिटं बाकी असतानाच आपला डेस्क सोडला... अधिकाऱ्याच्या या निष्काळजीपणाबद्दल विभागाच्या चार अधिकाऱ्यांना एक प्रेस कॉन्फरन्स बोलावून संपूर्ण जनतेची माफी मागावी लागलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, ६४ वर्षांच्या या अधिकाऱ्यावर गेल्या काही काळापासून नजर ठेवली गेली होती. त्यातून या अधिकाऱ्यानं गेल्या ७ महिन्यांत २६ वेळा लंचपूर्वीच आपला डेस्क सोडल्याचं निदर्शनास आलं. विभागानं या अधिकाऱ्याला यासाठी समज दिली आणि असं पुन्हा घडणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्लाही दिला.
विभागात १ वाजता लंच टाईम असतो.. दोषी अधिकाऱ्यानं लंचपूर्वी तीन मिनिट बाकी असतानाच १२.५७ ला आपला डेस्क सोडला. त्यामुळे तो अधिकारी लोक सेवा कायद्याचं उल्लंघन करण्यासाठी दोषी आढळलाय, असं या पत्रकार परिषदेत इतर अधिकाऱ्यांनी सांगितलं.
जपानमध्ये लोक सेवा कायद्यानुसार, कामाच्या वेळेत कर्मचाऱ्याचं लक्ष केवळ कामावर असावं... या दरम्यान कर्मचाऱ्यानं इतर गोष्टींत लक्ष घातलं तर तो कंपनी आणि विभागाकडून दोषी ठरतो, हे विशेष... हा कायदा जपानच्या सरकारी आणि खाजगी विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे. आपलं काम संपवण्यासाठी जपानचे लोक ओव्हरटाईमदेखील करतात... यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचं अतिरिक्त वेतन दिलं जात नाही. यामुळे जपानमधील कर्मचारी अनेकदा तणावाचे बळी ठरतात, असंही एका सर्व्हेमध्ये उघड झालं होतं.