पाकिस्तानचा बुरखा पुन्हा फाटला, मसूद अजहर जेल बाहेरच
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या, पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड मसूद अजहर कारागृहातच नसल्याचं उघड झालं आहे.
बहावलपूर : जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या, पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड मसूद अजहर कारागृहातच नसल्याचं उघड झालं आहे. पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्ताननं मसूद अजहरला पकडून कारागृहात टाकल्याचं सांगितलं जात होतं. त्याची प्रकृती देखील ठीक नसल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र आता पुलवामा हल्ल्यानंतर कधीही मसूद अजहरला कारागृहात टाकलंच नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मसूद अजहर बहवालपूरच्या मरकज सुभान अल्लाहमध्ये असल्याची सूत्रांची माहिती आहे. मसूद अजहर मुळात पाकिस्तानच्या बहावलपूरचाच रहिवासी आहे. त्याच ठिकाणाहून तो दहशतवादी कारवाया करतो. मसूद अजहरची प्रकृती पहिल्यापेक्षा चांगली आहे मात्र सार्वजनिक स्थळांवर जाणं तसंच धार्मिक भाषणं करणं टाळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र मसूद कारागृहातच नसल्याच्या वृत्तामुळे पाकिस्तानच्या खोट्या कारवाईचा बुरखा फाटला आहे.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने मे महिन्यात मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं होतं. भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० आणि ३५ ए हटवल्यानंतर पाकिस्तान चांगलंच बिथरलं आहे. सीमारेषेवरही पाकिस्तानने त्यांची कुमक वाढवली आहे. तसंच काश्मीरमधल्या घडामोडीनंतर पाकिस्तान पुलवामासारखा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यानंतरच मसूद अजहर कारागृहात नसल्याचं समोर आलं आहे.