Candy खाण्यासाठी ही कंपनी वर्षाला देतेय 61 लाखांचं पॅकेज; पाहिलीये का अशी अफलातून Job Offer?
नव्या नोकरीच्या शोधात आहात?
Chief Candy Officer: तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? चांगल्या पगाराच्या नोकरीसोबतच कामाचा ताण नसणारी नोकरी शोधण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात का? चला तर मग, थोडंसं तुमच्या बालपणात डोकावून पाहुया. कारण नोकरीच्या संधीचा बालपणानीच थेट संबंध आहे.
बालपणीच्या दिवसांमध्ये तुम्ही कधी, कॅण्डी खाल्लीय का? अर्थात खाल्ली असेल. रंगीबेरंगी, विशिष्ट चव आणि आकार असणारी कॅण्डी म्हणजे अखंड जगातील लहानग्यांचा आणि मोठ्या झालेल्या पिढीच्या बालपणीचा एक अविभाज्य भाग.
याच कॅण्डीमुळं आता तुम्हाला नोकरी मिळू शकणार आहे. जगातील कॅण्डी उत्पादनकर्त्या कॅण्डी फनहाऊस या कंपनीकडून नोकरीच्या संधीची जाहिरात करण्यात आली आहे. ही कंपनी चॉकलेट बारपासून लिकोराईसपर्यंतच्या विक्रीसाठी ओळखली जाते.
चव चाखण्यासाठी लाखो रुपये...
कॅनडास्थित या कंपनीकडून नुकतीच एक जाहिरात करण्यात आली आहे. ज्यामध्ये $100,000 कॅनेडियन डॉलर (61.14 लाख रुपये) इतका पगार प्रती वर्षी देण्यात येणार असल्याचं सांगितलं गेलं आहे. बरं, यासाठी तुम्हाला कुठे जाण्याचीही गरज नाही. कारण कंपनी वर्क फ्रॉम ही सुविधाही देत आहे.
लिंक्डीनवरही देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये या नोकरीसाठीच्या काही तरतुदी आणि अपेक्षा नमुद करण्यात आल्या आहेत. जिथं कर्मचाऱ्यांना कॅण्डी बोर्डाच्या सभा, चव घेणारे पर्यवेक्षक अशी कामं करावी लागणार आहेत. आई- वडिलांच्या परवानगीनंतर पाच वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांसाठीही ही संधी उपलब्ध आहे.
चीफ कॅण्डी ऑफिसर, असं हे पद असून सध्या त्यासाठी असंख्यजणांनी अर्ज दाखल केला आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जमील हेजाजी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार या पदावर रुजू होणाऱ्या व्यक्तीला दर महिन्याला मोठ्या प्रमाणात कॅण्डी खावी लागणार आहे. दिवसागणिक हे प्रमाण साधारण 117 कॅण्डी इतकं असेल.
आजवर नोकरीच्या अनेक जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील. पण, आगळ्यावेगळ्या नोकरीच्या यादीत ही कॅण्डीची यादी भलतीच लोकप्रिय ठरतेय.