Joe Biden Big Decision: संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीला मोठं वळण मिळालं आहे. विद्यमान अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आगामी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीमधून माघार घेतली आहे. बायडन पुन्हा राष्ट्राध्यक्ष होण्याच्या शर्यतीमधून स्वइच्छेने बाहेर पडले आहेत. त्यांनी स्वत: याबद्दलचा खुलासा केला आहे. एका पत्राच्या माध्यमातून बायडन यांनी ही घोषणा केली आहे. पुढील आठवड्यामध्ये बायडन देशाला संबोधित करणार आहे. विशेष म्हणजे स्वत: नाव मागे घेताना बायडन यांनी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीमध्ये उपराष्ट्रपती कमला हॅरीस यांच्या नावाला आपलं समर्थन असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना खरोखरच उमेदवारी मिळाली आणि त्या जिंकल्या तर त्या अमेरिकेच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष होऊ शकतील.


आधीपासूनच होती चर्चा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील काही आठवड्यांपासून सातत्याने बायडन हे पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढणार अशी जोरदार चर्चा होती. यासंदर्भात बऱ्याच उलट सुलट चर्चा सुरु आहेत. मात्र त्यांच्या प्रकृतीसंदर्भातील अनेक बाबींमुळे ते चर्चेत होते. म्हणूनच ते निवडणूक लढणार नाही अशी शक्यता फार आधीपासूनच व्यक्त केली जात असते. रविवारी या चर्चांना बायडेन यांनीच पूर्णविराम दिला आहे. 


चर्चासत्रात ट्रम्प यांच्याकडून धोबीपछाड


बायडन हे अमेरिकी राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणुकीमधून मघार घेतील अशी चर्चा तेव्हापासूनच सुरु झाली तेव्हा ते लाइव्ह चर्चासत्रामध्ये त्यांचे प्रमुख विरोध असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात पिछाडीवर पडले. निवडणुकीच्या आधी रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षादरम्यान डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन या दोघांमध्ये पहिलं अधिकृत चर्चासत्र पार पडलं होतं. या चर्चासत्रामध्ये ट्रम्प यांनी बायडेन यांच्याविरुद्ध दमदार कामगिरी केली. त्यामुळेच राजकीय वर्तुळाबरोबरच प्रसारमाध्यमांमध्ये बायडन यांनी माघार घेणं सोयीस्कर ठरेल असं सांगण्यात आलं होतं. 


आधी म्हणाले शेवटपर्यंत लढणार


ट्रम्प आणि बायडन यांच्यामधील चर्चासत्रानंतर 'न्यू यॉर्क टाइम्स'ने आपल्या अग्रलेखामध्ये आपल्या देशाचं भलं व्हावं यासाठी बायडन यांनी या निवडणुकीतून माघार घ्यावी असं म्हटलं होतं. त्यानंतर बायडन यांनी खरोखरच निवडणुकीतून माघार घेणं गरजेचं असल्याचं सांगत एका गटाने दबाव निर्माण करण्यास सुरुवात केला. मात्र बायडन आणि त्यांच्या प्रचार समितीने ते पराभव स्वीकारणार नाही आणि शेवटपर्यंत लढत राहणार असं सांगितलं होतं.


मतदान कधी?


ट्रम्प आणि बायडन यांच्यादरम्यानच्या लाइव्ह चर्चेमध्ये बायडन यांना प्रभावी कामगिरी करता आली नाही. ते या चर्चेदरम्यान अनेकदा गोंधळून गेल्याचे आणि अडखळून थांबल्याचं पाहायला मिळालं. ते ट्रम्प यांनी केलेल्या आरोपांना समाधानकराक उत्तरं देऊ शकले नाहीत. त्यामुळेच बायडन उमेदवार असतील तर ट्रम्प यांच्याविरुद्ध जिंकणं कठीण असल्याचं सांगण्यात आलं. बायडन हे 81 वर्षांचे असून त्यांना विसरण्याची समस्या असल्याची चर्चा आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये ते बोलता बोलता थांबतात आणि विसरुन जातात. पाच नोव्हेंबर रोजी अमेरिकेत मतदान होणार असून त्याच्या चार महिने आधीच बायडेन यांनी माघार घेतली आहे. 


कमला हॅरिस काय म्हणाल्या?


बायडन यांनी कमला हॅरिस यांचं नाव सुचवल्यानंतर त्यांनी बायडन यांचे आभार मानताना डेमोक्रेटिक पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी आपण कोणतीही कसर सोडणार नाही असं म्हटलं. कमला हॅरिस यांना पक्षातील इतर नेत्यांचेही समर्थन असल्याने त्यांची दावेदारी भक्कम मानली जात आहे.