कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येप्रकरणी पुन्हा एकदा भारतावर आरोप केले आहेत. एका पत्रकारने जस्टिन ट्रूडो यांनी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येच्या तपासात काय प्रगती आहे? जर काही प्रगती नसेल तर अमेरिका आणि कॅनडाने भारताप्रती कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे का? अशी विचारणा केली. याचं उत्तर देताना जस्टिन ट्रूडो यांनी पुन्हा एकदा संसदेत केलेल्या सर्व आरोपांची पुनरावृत्ती केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जस्टिन ट्रूडो म्हणाले की, सुरुवातीलाच जेव्हा आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून कॅनडाच्या भूमीवर एका कॅनडीयन नागरिकाची भारती सरकारच्या एजंट्सनी हत्या केल्याची माहिती मिळाली तेव्हा आम्ही भारताशी संपर्क साधला होता. आम्ही भारताला या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी आम्हाला तपासात सहकार्य करण्याची विनंती केली होती. पुढे ते म्हणाले की "आंतरराष्ट्रीय कायदा आणि कॅनडाच्या सार्वभौमत्वाच्या गंभीर उल्लंघनावर कारवाई करण्यासाठी आम्ही अमेरिका आणि आमच्या इतर मित्र देशांशी संपर्क साधला. ही एक अशी बाब आहे जी आम्ही फार गांभीर्याने घेतली आहे".


"कॅनडा नेहमीच कायद्याचं पालन करणारा देश"


आम्ही आमचे सर्व सहकारी आणि भागीदारांसह काम करणं सुरु ठेवणार आहे. तपास यंत्रणाही आपलं काम करत राहणार आहेत असं जस्टिन ट्रूडो यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले की "कॅनडा एक असा देश आहे जो नेहमीच कायद्याचं पालन करतो आणि त्यासाठी उभा राहतो. कारण जर ताकदीवरुन योग्य आणि चूक असे निर्णय होऊ लागले, जर मोठे देश कोणत्याही परिणामाची चिंता न करता आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करु लागले तर संपूर्ण जग सर्वांसाठी अधिक धोकादायक होईल".


'भारताने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केलं'


कॅनडाचे खासदार चंदन आर्य यांनी पार्लमेंट हिलवर आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारताचे कॅनडातील उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांना निमंत्रित करण्याच्या प्रश्नावर जस्टिन ट्रूडो म्हणाले, 'आम्ही स्पष्ट आहोत की आम्ही या गंभीर विषयावर भारतासोबत काम करू. याच्या तळापर्यंत जाण्यासाठी आम्ही भारत सरकार आणि जगभरातील आमच्या भागीदारांशी संपर्क साधला आहे. म्हणूनच जेव्हा भारताने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले आणि 40 हून अधिक कॅनेडियन राजनैतिक अधिकाऱ्यांना मायदेशी पाठवलं तेव्हा आम्ही खूप निराश झालो".


"भारतासह काम करणं सुरु ठेवणार आहोत"


आम्ही भारतासह रचनात्मक आणि सकारात्मकपणे काम करण्याचा प्रयत्न केला असून यापुढेही करत राहू. याचा अर्थ आम्ही भारत सरकारच्या राजदूतांसह काम करणं सुरु ठेवणार आहोत असं जस्टिन ट्रूडो यांनी स्पष्ट केलं आहे. जस्टिन ट्रूडो म्हणाले की, "आम्हाला या मुद्द्यावर लढाई नको आहे. पण आम्ही स्पष्टपणे कायद्याच्या बाजूने उभे राहणार आहोत. कारण कॅनडा सरकार कायद्यावर विश्वास ठेवतं". 


हरदीप सिंह निज्जर याची याचवर्षी 18 जूनला एका गुरुद्वाराच्या पार्किंगमध्ये अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. निज्जरला भारत सरकारने दहशतवादी घोषित केलं होतं.