उपाशीपोटी स्वत:ला पुराल तर स्वर्गात येशूला भेटाल, अंधश्रद्धेनं घेतला 47 निष्पापांचा बळी
एकविसव्या शतकातही अंधश्रद्धेचं भूत लोकांच्या मानगुटीवर किती घट्ट बसलंय याचं भीषण उदाहरण समोर आलं आहे. स्वर्गप्राप्तीसाठी एका पादरीने सांगितलेला अघोरी उपाय लोकांनी अंमलात आणला आणि यात 47 लोकांचा मृत्यू झाला.
Kenia Superstition News : अंधश्रध्देची हादरवून टाकणारी एक घटना समोर आली आहे. अंधश्रद्धेमुळे (Superstition) तब्बल 47 जणांचे बळी गेले असून या घटनेने जगभरात खळबळ उडाली आहे. उपाशीपोटी जर स्वत:ला पुरलं तर येशूची भेट होईल आणि स्वर्ग (Heaven) मिळेल असं एका पाद्रीने (Pastor) लोकांना सांगितलं होतं. त्याच्या सूचनेनुसार या अंधश्रद्धाळू लोकांनी उपवास केला. पोलिसांना ही बातमी कळताच त्यांनी एका पाद्रीच्या घरात तपास केला. तेव्हा पोलिसांना जमिनीत पुरलेल्या तब्बल 65 कबरी मिळाल्या. याप्रकरणी गुड न्यूज इंटरनॅशनल चर्चचा पाद्री पॉल मॅकेन्झीला (Pastor Paul McKenzie) या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून अजून कबरी खोदण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
पादरीवर भक्तीभावाने विश्वास ठेवला
तुम्ही जर उपाशी पोटी स्वत:ला पुरलं तर येशूची भेट होईल आणि स्वर्गात झाल असं या पाद्रीनं लोकांना सांगितलं. त्याच्या सूचनेनुसार अनेक अंधश्रद्धाळू लोकांनी उपवास केला. पादरीने त्यांना येशूकडे जाण्याचा मार्ग सांगितला. मात्र हा मार्गच या निरपराध जीवांसाठी मृत्यूचा मार्ग ठरला. या पादरीच्या जागेतून हे मृतदेह सापडल्यानंतर या सगळ्या प्रकाराची उकल झालीय. यात एकाच कुटुंबातील 5 जणांचा समावेश आहे.
हा सगळा प्रकार केनियात (Kenya) घडलाय. महत्वाचं म्हणजे पाद्री पॉल मॅकेन्झीला याआधीही दोन मुलांच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार धरण्यात आलं होतं. केनियातल्या शाकाहोलाच्या जंगलातही आणखी काही मृतदेह मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 14 एप्रिलला एक मृतदेह मिळाल्यानंतर याप्रकरणाची उकल झाली. याप्रकरणी पादरीला अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या शोधमोहिमेत एकामागोमाग एक मृतदेह सापडत गेले.
पोलिसांना मिळाली गुप्त माहिती
पोलिसांना या घटनेची गुप्त माहिती मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी मालिंदी भागात पादरीच्या विविध जागांवर छापा मारला. यात त्यांना मृतदेह सापडले. या सर्व मृतदेहाचा डिएनए सॅम्पल पोलीस गोळा करत आहेत. उपाशी राहिल्याने लोकांचा मृत्यू झाला आहे की नाही याबाबत डिएनए सॅम्पलच्या रिपोर्टनंतर स्पष्ट होणार आहे.
निर्दोष असल्याचा पादरीचा दावा
47 लोकांच्या मृत्यू कारणीभूत ठरलेल्या पॉल मॅकेन्झी अर्थत त्या पादरीने आपण निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. 2019 मध्येच आपण चर्च बंद केल्याचा तो म्हणतोय. पण हे पहिलंच प्रकरण नाहीए. याआधी 2019 मध्ये पॉल मॅकेन्झीला अटक करण्यात आली होती. 2019 मध्ये दोन मुलांचा मृत्यू झाला होता. याला पादरी पॉल मॅकेन्झी जबाबदारी असल्याचा आरोप मुलांच्या आई-वडिलांनी केला होता.