नवी दिल्ली : अमेरिकेच्या एअर स्ट्राईकमध्ये इराणी जनरल कासिम सुलेमानी याच्या हत्येनंतर बुधवारी प्रत्यूत्तरादाखल इराणनं अमेरिकेच्या इराकमधील तीन ठिकाणांवर हल्ला चढवला. यामध्ये, अमेरिकेच्या तीन सैन्य ठिकाणं, इरबिर अल - असद आणि ताजी एअरबेस इथं अनेक रॉकेटच्या सहाय्यानं हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांनी अमेरिका आणि इराण दरम्यानच्या तणावात आणखीन वाढ झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरिया यो दोन्ही देशांशी संबंध टोकाला गेलेले दिसत आहेत. अशा परिस्थितीत तिसऱ्या युद्धाची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच रशियावर लादलेले अनेक प्रतिबंध एक वेगळीच कहाणी कथन करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तिसरं युद्ध झालंच तर ते आत्तापर्यंतच सर्वाधिक नुकसानकारक युद्ध ठरेल यात शंका नाही. यामध्ये काही देश नकाशावरूनच नाहिसे होऊ शकतात. पण, आज तिसरं युद्ध झालंच तर कोणता देश कुणाच्या बाजुनं उभा असेल? किंवा कोणता देश तटस्थ भूमिका घेईल किंवा कोणता देश कुणाला अप्रत्यक्षरित्या मदत करेल, याची चाचपणी आंतरराष्ट्रीय पातळीवरही केली जातेय.


हल्ला झालाच तर अनेक देश इराणच्या बाजुनं उभे राहत बलाढ्य अमेरिकेच्या दादागिरीला विरोध करतील, हे स्पष्ट आहे. यामध्ये, इराणच्या मदतीला धावून जाणारा पहिला देश असेल रशिया... इराणचा मित्रदेश. त्यानंतर चीनही अमेरिकेविरुद्ध कारवाई करत इराणला मदत करेल. 


उल्लेखनीय म्हणजे, ज्या इराकमध्ये इराणनं अमेरिकेच्या तळांवर हल्ले चढवले त्या इराकनंही इराणचीच साथ दिल्याचं दिसतंय. त्याशिवय यमन, लेबनन, सीरिया आणि पॅलेस्टाईन हे देशदेखील इराणची साथ देत आहेत. 


तर दुसरीकडे इंग्लंड, फ्रान्स, इस्राईल, सौदी अरेबिया, जॉर्डन आणि यूएई डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत उभे राहतील. यातील अनेक देश असेही आहेत ज्यांना अमेरिकेची आणि डोनाल्ड ट्रम्प यांची दादागिरी पसंत नाही परंतु युद्ध झालं तर ते अमेरिकेलाच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करतील. याचं कारण म्हणजे, यातील अनेक देश पश्चिम आशियामध्ये इराणचं वर्चस्व कमी व्हावं, यासाठी प्रयत्नशील आहेत. 



आज आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका आणि चीन यांचं वर्चस्व आहे. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था ढासळत असताना चीन इराणसोबत राहिला तर अमेरिकाही मागे हटणार नाही. अशावेळी रशिया आणि भारत यांसारख्या देशांना चीन किंवा अमेरिका यापैंकी एकाची निवड करावी लागेल. 


तिसऱ्या युद्धाची शक्यता वर्तवली जात असताना इराकही आपल्या मित्रदेशांच्या संपर्कात आहे. भारतात इराणचे राजदूत अली चेगेनी यांनी, अमेरिकेसोबत तणाव कमी करण्याच्या दृष्टीनं भारतानं काही पाऊल उचलले तर इराण त्याचं स्वागतच करेल असं म्हटलंय. 'आम्हाला युद्ध नको, आम्हालाही क्षेत्रातील सर्वांसाठी शांति आणि समृद्धी हवीय. यासाठी भारताच्या कोणत्याही पावलाचं आणि योजनांचं आम्ही स्वागतच करू' असं चेगेनी यांनी ट्विटरवर म्हटलंय.